Monday, December 12, 2011

पाहुण्यांचे घर


Jelaluddin Rumi, यांच्या "The Guest House" कवितेचा अनुवाद:

पाहुण्यांचे घर

प्रत्येक जण, प्रत्येक मन म्हणजे पाहुण्यांचे घर
रोज सकाळी एक नवे आगमन.

आनंदाचे तुषार, उदासिनतेचे थेंब,
नीचतेचा उगम माहित नसलेला आणि अचानक फुटणारा काळा झरा,
क्षणभराची विजेसारखी चमकून मन उजळून टाकणारी जाणिवेची अनुभुती,
हे सगळे येतात अचानक उतरणाऱ्या पाहुण्यांसारखे.

स्वागत कर आणि खातिरदारी कर सगळ्या सगळ्यांची.
जरी असला तो दु:खाचा जमाव,
तुझे घर एका फटकाऱ्यात झाडून टाकणारा, आणि सगळ्या वस्तू फेकून देणारा ....
... तरी प्रत्येक पाहुण्याचा आदर ठेव,
तो जागा करत असेल तुझ्या घरात, नवीन प्रकाशासाठी.
वाईट, लाजिरवाणे, कारस्थानी
सगळ्यांचं हसून स्वागत कर दरवाजापाशी, आणि
मायेनं आत घे सगळ्यांना.

जे आत येतंय त्यासाठी कृतज्ञ रहा, कारण
प्रत्येक जण/विचार हा दिक्कालातून येणारा वाटाड्या
हे उमजून अस, मित्रा !
(लमाल डिसेंबर २०११, विषय "पाहुणे")

Saturday, October 8, 2011

मी - एक अ-स्पर्धक

"आयुष्य म्हणजे एक स्पर्धा आहे" किंवा "आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे" ही आणि असली वाक्यं
मी जेव्हा ऐकते तेव्हा ती कानामागे करणं या शिवाय मला दुसरा पर्यायच नाहीये, हे मला माझ्या अगदी
लहानपणीच स्पष्ट झालं होतं.

ससा आणि कासव ह्यांच्या शर्यतीची गोष्ट ऐकल्यानंतर त्यातलं अपेक्षित असलेलं "slow and steady
wins the race" हे तात्पर्य सोडून तेव्हा आणि अजूनही काय जाणवतं ते की कासवानं जाता जाता
जेव्हा त्याला ससा झोपलेला दिसला त्याला उठवलं असतं तर दोघं मिळून धावायला किती मजा
आली असती. त्यांना प्रवासाचा आनंद घेता आला असता, किंवा सशानेही सुरुवातीला कासवाच्या
इतक्या पुढे जाण्यापेक्षा त्याच्या साठी थांबला असता तर .... वगैरे वगैरे.

मग ही जी अस्पर्धक असल्याची भावना मला आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगात आपलं अस्तित्व दाखवित असते.

शाळेत असतांना सुध्दा वर्गाच्या सगळ्या तुकड्यांमधून सगळ्यात जास्त गुण मिळालेल्या १० जणांची यादी
प्रार्थनेच्या वेळी सांगितल्या जायची. सगळेजण अगदी उत्सुकतेने वाट बघत असायचे. माझ्या शेजारीच उभ्या
असलेल्या नेहमी पहिला नंबर येणार्या मुलीची मनस्थिती पाहून "देवा, हिला पहिला नंबर मिळू दे" अशी
इच्छा माझ्याही नकळत केलेली आठवते. नंतरची कितीतरी वर्षे माझा तिसरा नंबर ठरलेला होता.
नंतर शाळेतच घडलेला एक प्रसंग: भौतिकशास्त्राच्या तासाला घडलेला. सर पाण्यात नाणे टाकून त्याचा
आकार कसा बदलतो हे शिकवत होते. प्रात्यक्षिक म्हणून प्रत्येकाला एका काचेच्या भांड्यातील पाण्यात
टाकेलेले नाणे दाखवित होते, आणि बरोबर उत्तर देण्याची वर्गामध्ये स्पर्धा सुरु होती. उत्तर अगदीच
सोपे होते. जे दिसत होते तेच सांगायचे होते, कुणी चुकायचा प्रश्नच नव्हता, तरी पण वर्गात नुकत्याच,
नवीन आलेल्या मुलीने सपशेल चुकीचे उत्तर दिले. जेव्हा माझी उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा ते नाणे
धडधडीत मोठे दिसत असूनसुद्धा मी उत्तर मात्र ती नवीन एकटी पडू नये,  म्हणून दिले "लहान". सरांची
ती अविश्वासाची नजर मला अजून आठवते. हसायला येतं, स्पर्धेत असोशीनं भाग घेण्याच्या ऐवजी मला
त्या धड ओळखही नसलेल्या मुलीला सोबत करणं महत्वाचं वाटावं, आणि ते ही ढळढळीत दिसत असलेलं
सत्य नाकारुन.

क्रिकेटच्या कितीतरी मॅचेस पाहतांना माझ्याही नकळत मी हरत असलेल्या टीमच्या बाजूने व्हायचे.
आयुष्यात जेव्हा केव्हा बक्षिसं मिळाली, तेव्हा जिंकण्याचा आनंद नक्कीच झाला, पण "समाधानाचे
शिखर निसरडं असतं" ह्या प्रमाणे त्या क्षणांना कधी साठवून ठेवलेलं नाही.

याचा अर्थ विजयाच्या आनंदाला, त्यासाठी कराव्या लागणार्या मेहनतीला मी कमी लेखतेय असं
मुळीच नाही, पण आयुष्यात काही वाटा हातावरच्या अंतरावर असून अस्पर्श राहतात, त्यातलीच
ही एक वाट माझ्यासाठी - स्पर्धेची !