Saturday, June 13, 2020

ताकाको कोनीशी ची आत्महत्या


नोव्हेंबर २००१ च्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकन प्रसारमाध्यमांतून एक बातमी झळकत होती. “मिनिसोटा येथील डेट्रॉईट लेक्स जवळच्या रानामध्ये एका bow hunter ला म्हणजे शिकाऱ्याला, शिकारीसाठी भटकत असतांना, बर्फात एका जपानी तरुणीचे प्रेत सापडले. ह्या तरुणीचे नाव होते, “ताकाको कोनीशी”. “ताकाको कोनीशी” टोकीयो मध्ये एक ऑफीस वर्कर म्हणून नोकरी करीत होती. अठ्ठावीस वर्षांशी ताकाको, मिनिसोटा मध्ये त्यात महिन्याच्या सुरुवातीला येऊन पोहोचली. तिथून बिस्मार्क ला गेली आणि फार्गो मार्गे Detroit Lakes ला येऊन पोहोचली, जिथे तिचा मृत्यु झाला. तिच्या ह्या रहस्यमय मृत्यु बद्दल प्रसारमाध्यमांनी अनेक तर्कवितर्क लढविले, आणि ताकाकोच्या मृत्युचे, त्यांनी त्यांच्या आवडीचे असे सनसनाटी कारण शोधले, “ताकाको कोनीशी “फार्गो” सिनेमाला एक खरी घडलेली गोष्ट समजून त्या सिनेमात हरवलेले आणि कुणालाही न सापडलेले पैसे शोधायला आपला देश सोडून इथे आली.”


आपल्यापैकी काही लोकांनी “फार्गो” ह्या १९९६ सालच्या चित्रपटाबद्दल ऐकलं असेल. “फार्गो” हा Dark Cinema Masterpiece म्हणून ओळखल्या जातो. चित्रपटाच्या सुरुवातीला “Based on the true story” असे वाक्य येते. या सिनेमात एक सामान्य कार सेल्समन आपल्या स्वतःच्याच बायकोचे अपहरण घडवून आपल्या सासऱ्याकडून पैसे मिळवण्याची योजना आखतो. त्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांना मिलियन डॉलर मिळतात ही पण त्याच्या बरोबरीने या योजनेत सामील असलेल्या साथीदाराबरोबर शेवटच्या क्षणी मारामारी होते आणि ती पैशांनी भरलेली बॅग एका अपरिचित रस्त्यावर एका कुंपणावरून तो फेकून देतो. चित्रपटातील ही घटना घडलेली दाखवलेली आहे ती नॉर्थ डकोटा या राज्यातील फार्गो ह्या गावात. सिनेमाच्या सुरुवातीला झळकणारे “सत्यघटनेवर आधारित” असे शब्द केवळ त्या अपहरण कथेची मोहिनी प्रेक्षकांवर बसावी म्हणून दाखविलेले असतात.

तरीही एक जपानी तरुणी एका अमेरिकन सिनेमाला खरं समजून आपला देश सोडून नवख्या प्रदेशात पैसा शोधायला म्हणून येते आणि Detroit Lakes सारख्या आडवाटेच्या, निर्जन भागातल्या बर्फात तिचे प्रेत सापडते, ही बातमी आणि त्या आत्महत्येच्या बातमीसोबत क्राईम सीनच्या फोटोमध्ये, ताकाको बर्फात पडलीये, काळा मिनी स्कर्ट, काळे बूट आणि फक्त कमरेपर्यंत येणारा काळा कोट आणि फिक्कट फिक्कट दिसणारा तिचा चेहरा!

खरंच सत्य आणि वास्तव यात इतकी गल्लत करू शकतो? आपल्या घरापासून कोसो दूर असलेल्या एकाकी बर्फात मरण येणे इतकी मोठी गल्लत?

मी ती बातमी वाचून स्तब्ध बसू शकलो नाही. मला ही चित्रपट आवडतात, माझाही “फार्गो” हा अतिशय आवडलेला चित्रपट. खरंच ताकाको कोनोशी या जगाने ठरवल्याप्रमाणे एका अमेरिकन सिनेमाला खरं समजून आपलं आयुष्य अंतापर्यंत उधळून जाऊन देणारी माथेफिरू होती? पैसा हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानणारी? खरंच ताकाको कशी होती? मला नक्की कुठल्या कारणाने ते माहित नाही मात्र मी ताकाको कोनोशीला हसण्यावारी मनाबाहेर टाकू शकलो नाही. मी कोनोशी च्या प्रवासाच्या पाऊलखुणा वाचायच्या ठरवल्या.

ताकाको तिथून बिस्मार्क ला गेली आणि फार्गो मार्गे Detroit Lakes ला येऊन पोहोचली होती. फेब्रुवारीच्या अखेरीस, मी बिस्मार्क मध्ये, ताकाको च्या शेवटच्या दिवसांच्या प्रवासाच्या वाटेवर होतो. “फार्गो” चे दिग्दर्शक, “कोएन ब्रदर्स” ने ह्याच भागातले, त्यांनी अमेरीकेच्या ह्या प्रदेशाचे अगदी नेमके वर्णन “सायबेरीया with family restaurants” असे केले आहे.

मी पहिल्यांदा बिस्मार्क पोलिस ऑफिसर शी बोललो, जेसी हेलीमन. त्याला हे पहिल्यांदा मी हे नक्की काय करतो आणि का करतोय हे त्याला समजेना. शेवटी मी त्याला “तू फक्त जे झाले तसे मला सांग फक्त “ असे म्हणालो. जेसी ज्या दिवशी ताकाको कोनीशीला भेटला तो इतर दिवसांकरता इतर दिवसांसारखाच एक दिवस होता. ताकाको चे कपडे पाहून तो जरा चरकला. … “आता नॉर्थ डकोटा मध्ये मिनीस्कर्ट म्हणजे जरा … म्हणजे आणि इथली हवा बघता” असे म्हणून त्याने सावरून घेतले असं मला वाटलं.

ताकाको त्याला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होती. तिला इंग्लिश येत नव्हतं आणि त्याला जपानी. तिच्या त्या मोडक्यातोडक्या इंग्लिश मधून एकच शब्द त्याला वारंवार ऐकू आला, “फार्गो, फार्गो, फार्गो”. मग तिने एक नकाशा काढला. त्यावर एक X आकाराची खूण होती, एक रस्ता होता आणि त्याला लागून एक झाड. बाकी काहीच नाही.

आता त्या भागात असे कितीतरी रस्ते आणि कितीतरी झाडे त्यामुळे त्यामुळे ती कुठल्या जागेबद्दल बोलते आहे याचा अंदाज लावणे म्हणजे मूर्खपणाच. मग जेसीने आपल्या मदतनिसाला बोलावले. त्याला मात्र तो मॅप पाहताक्षणी “फार्गो” चा ट्रेझर मॅप वाटला.

मग त्या दोघांनी तिला परोपरीने सांगायचा प्रयत्न केला सिनेमा हा काही खरा काही नाही, पण तिला ते कळले किंवा पटले आहे असे काही वाटले नाही. शेवटी जेसी तिला बस स्टेशनवर सोडून आला. तिथे जात असताना ताकाको पोटाला धरून काही तरी पुटपुटली असे त्याला वाटले. त्याने विचारता, त्याला ती कॅन्सर असे म्हणत आहे असे वाटले. बिचारी . ‘काही मदत लागली तर माग’ असे सांगून जेसीने तिचा निरोप घेतला.

पुढचा मुक्काम “फार्गो” : बिस्मार्क हून सुमारे चार तासांचा प्रवास. अविश्वसनीय इतक्या सरळसोट रस्त्यावरचा.

दुसरी व्यक्ती: हॉटेलचा मॅनेजर. ह्याच्याच मॉटेल मध्ये ताकाको ने तिच्या आयुष्यातील शेवटच्या दोन रात्री घालविल्या होत्या. त्याला ती नक्कीच आठवत होती. एक जपानी तरुण बाई एकटी इतक्या दूरच्या गावात. त्याला तिचे आकर्षणही वाटले होते. तो ताकाको शी एक-दोनदा बोलला होता. त्याला ती एकाकी वाटली होती. “पण माझी असते रात्रपाळी आणि त्या वेळेला कोण उत्त्साहात असणारे? तो काहीसे हसत म्हणाला. “पण तिच्या मृत्युबद्दलच्या बातम्यांमध्ये ती फार्गो मधल्या लुटलेल्या पैशाच्या शोधात होती आणि त्यातच ती गेली” हे ऐकून मात्र मला आश्चर्य वाटले, कारण ती इथे असतांना तिने “फार्गो” चा उल्लेख ही केला नव्हता.”
मी ते दोघं कशाबद्दल बोलले, असं विचारले. माझ्या लक्षात आलं की ताकाको तिच्या शेवटच्या दिवसांत, “फार्गो” बद्दल कुणाशीही काहीही बोलली नव्हती. तिच्या मनात दुसरे काहीतरी विचार सुरु होते. तिने त्याला विचारले होते, “ आकाशातले तारे कुठुन दिसू शकतील?” त्याला तिच्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले होते. पण तरिही त्याने तिला मॅपवर रात्री तारे कुठुन छान दिसू शकतील ती जागा दाखवली होती.

मी ताकाको ज्या रूम मध्ये राहिली होती तिथे गेलो. तिच्या बेडवर झोपली होती तिथे झोपलो डोळे बंद केले. सगळे तुकडे जुळवायचा प्रयत्न करू लागलो. सगळे काही अर्थ लागेल, ह्या ऊंबरठ्यावर येऊन ठाकलेले. हॉटेलच्या रेकॉर्डस प्रमाणे, कोनोशी ने सिंगापूरला कॉल केला होता, महत्वाचा असावा, कारण त्यासाठी तिने तब्बल $७५ मोजले होते. तो तिने केलेला शेवटचा कॉल. मघाशी मी पण त्याच नंबरवर कॉल करुन पाहिला. कुणीच उचलला नाही. खिडकीबाहेर नजर टाकली. एक गठाळून टाकणारा पार्कींग लॉट, निराशा ओकत असलेली त्या मोटेल ची निऑन साईन. मी त्या खोलीत क्षणभरही थांबू शकलो नाही. ताबडतोब रुम बदलून घेतली.

ताकाको त्यानंतर तिच्या शेवटच्या मुक्कामाला, डेट्रॉईट लेक्स ला गेली होती.

तिसरी व्यक्ती: टॅक्सी ड्रायव्हर. तो म्हणाल “ती माझ्याशी काहीच बोलली नाही. फक्त डेट्रॉईट लेक्स ला मला घेऊन चल आणि ज्या भागात वस्ती नाही, तिथे त्याला सोडायला सांगितले. मी तसे केले.’
मी तिथे पोहोचलो. काहीच आवाज नव्हता.

“मी बघितलं तिला माझ्या घरातून दूरवरुन” चौथी व्यक्ती: डेब सांगत होती “मी माझ्या मुलांबरोबर बाहेर होते, तिथून मला ती दिसली, काळ्या कपड्यातील, चेटकीणीसारखी. मी माझ्या मुलांना ओढून आत नेलं”.
तिला वाईट वाटत होतं कारण ताकाको त्यांच्या आयुष्यात आली आणि गेली, अगदी काही क्षणांसाठी. प्रत्येकाला त्या क्षणांच्या बाहेर जाऊन ताकाकोला भेटायचं होतं. पण पण ….

दुसऱ्या दिवशी ताकाकोचं प्रेत सापडलं, एका शिकाऱ्याला. बर्फात गारठून मृत्यू!

इन्वेस्टीगेशन सुरु होते, त्यांना काही दिवसांनंतर ताकाकोने तिच्या आईवडिलांना पाठवलेल्या सुसाईड नोट बद्दल कळले. ती हातात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण तो पर्यंत त्याआधीच जेसी ने प्रसारमाध्यमां जवळ फार्गो चा उल्लेख केला होता. गोष्ट तिथेच अडकली. सत्यापासून दूर जात राहीली.

चीफ कीना मला सांगत होते: “तिने केलेला कॉल तिच्या एक्स बॉयफ्रेंड ला होता. तो “फार्गो” चा होता.

मला मी पहिल्यांदा वर्तमानात पाहिलेल्या ताकाकोचा फोटोवरची अनिश्चीततेची धूळ विरत होती. माझा प्रवास संपत आला होता. ती तिचे पैसे नाही तर त्याच्या पाऊलखुणा शोधत आली होती. तिच्यासाठी तेच सत्य होतं. ताकाको चित्रपटातली काल्पनिक व्यक्तिरेखा नव्हती, जिचा मृत्यु आणि पर्यायाने तिचे आयुष्य एक खुळचट कथा बनली होती, जगभर चालत असलेल्या चेष्टेचे मूळ कारण बनली होती. पण ताकाको केवळ करमणुकीची एका क्षणात लुप्त होणारी चांदणी नव्हती. ती एका जिवंत माणूस होती.

मी नंतर टोकीयोला तिच्या घरी गेलो, घरमालकीण ने दार उघडलं. ताकाको बद्ल वाईट वाटणाऱ्या लोकांमध्ये हिचा वरचा नंबर होता. खेड्यातली मुलगी शहरात नोकरी करायला म्हणून आली. कष्टाळू आणि प्रेमळ. एका अमेरिकन विवाहीत मित्रानं फसवलं. तो पुढे निघून गेला, ती मात्र सर्वस्वाने त्याच्यात अडकली. ती सैरभैर झाली, काहीही न सुचुन, जीवनाचा अर्थ शोधायला दुसऱ्या जगात गेली.

प्रत्येकाने ताकाकोला पाहिले आणि कुणीच पाहिले नाही.

( This Is A True Story, a documentary by Paul Berczeller च्या आत्मकथनावर आधारित)

लमाल जून २०२० "घटना"