प्रिय,
पत्र लिहीण्यास कारण की …..
आपल्या सुरुवातीच्या शालेय मैत्रीच्या काळात आपण “पत्र लिहिण्यास कारण की” ह्या मायन्याला
हसत असू. कारण आपली सगळी पत्र ही कारणशिवायच असायची, पत्र म्हणजे ह्या ह्रदयी ची त्या
हृदयी पोचवण्यासाठीचे माध्यम होते. दिवसभर बरोबर राहून सुद्धा रात्री झोपायच्या आधी काहीतरी
लिहायचे असे एकमेकींना. कुठलीही गोष्ट वाटली की नकळत ती करुन जाण्याचे ते निरागस दिवस.
नंतर उच्च शिक्षणासाठी दोघीनींही गाव सोडले आणि पुणे गाठले. मी तर काही वर्षे देशाबाहेर पण
राहून आले. आपण अगदी सहज दूर झालो. आपल्या मैत्रीत तेवढी परिपक्वता नक्कीच होती.
आपल्या भेटी विरळ होऊ लागल्या. पण “ही माझी लहानपणाची घट्ट मैत्रिण” ही ओळख मात्र
एकमेकींच्या मनात कायम राहीली.
आणि काही वर्षांनी ध्यानी मनी नसतांना नोकरीच्या ठिकाणी आपण अचानक भेटलो, तु त्या कंपनीत
आधी पासूनच रुळलेली होतीस. मी मात्र नवीन, पण तू आणि तुझ्या ग्रुप ने मला लवकरच स्वीकारले.
लंचटाईम च्या व्यतीरिक्त आपण दोघी रोज अर्धा तास चालायला जात असू. आणि तिथे आपल्या
मैत्रीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली.
मुलं तशी सुटी झाली होती आपली, त्यामुळे आयुष्यात तशी स्थैर्यता आली होती, आणि मग त्या
काही वर्षात आपण पुन्हा एकदा जवळ आलो. कधी मधी मुलं- नवऱ्या बरोबर पण आपल्या
भेटी व्हायच्या. तुझ्या बरोबरीनं माझ्या इतर ही ओळखी झाल्या होत्या, आणि रुपा, मैथिली
तर माझ्या छान मैत्रिणी झाल्या होत्या.आयुष्याला एक सहजसुंदर लय आली होती. खरंच
किती छान काळ होता तो. बरीच वर्षे गेली त्या लयीत. लंचटाईम मध्ये बोलतांना कधीमधी
रिटायरमेंट चा विषय निघत होता….
आणि एका रविवारी दुपारी बाल्कनी मध्ये आराम खुर्चीत बसलेला महेश उठलाच नाही. Massive
हार्ट अऍटक ! मी वरती काही आवरासावर करीत होते, महेशने आवाज दिला नाही की तो मला ऐकू
आला नाही हा प्रश्न अजूनही माझे ह्रदय विदिर्ण करुन जातो.
मुलं लगेच मिळाल्या त्या साधनाने घरी आली. दोन आठवडे झाल्यावर मी नोकरीवर रुजु झाले
पण मी पुर्वीची मी राहिले नव्हते. सगळ्यांना दु:खातून सावरेल हळू हळू असं वाटत होतं. रुजु झाल्यानंतर
दोन महिन्यातच मी नोकरीचा राजिनामा दिला. तुला आणि इतर सगळ्यांना धक्काच बसला. सगळ्यांनी
मला हरतऱ्हेने सांगून पाहिलं, पण माझं उत्तर “ आता काही नको वाटतंय”, कुणासाठीच समाधानकारक
नव्हतं, माझ्याशिवाय.
तुम्हांला सगळ्यांना मी काहीही सबबी सांगतेय वाटत होतं, तुम्हांला माझा राग येत होता, माझा निरोप
समारंभ पार पडेपर्यंत तुझा मी सोडून जातेय, यावर विश्वास नव्हता. मला तुला होणारा त्रास दिसत
होता पण मी मनाचे दरवाजे बंद करुन घेतल्यागत माझ्या पर्यंत पोचत नव्हता. अगदी काही वर्षांचा
प्रश्न असतांना, मी असं हे नोकरी सोडून जाण्याचा वेडेपणा कां करतेय हे कळतं नव्हतं. “ आता मन
लागत नाही” हे माझं उत्तर तुम्हाला सबब वाटत होती.
जगण्यासाठी कारण नसणं, हे मी अनुभवत होतेे. रोजचा दिवस उगवायचा तोच मनावर मणामणांचे ओझे
घेऊन. आतापर्यंतचे आयुष्य मी आणि महेश ने आपापल्या नोकऱ्या, करियर सांभाळून एकत्र घालविले होते.
पण उर्वरित आयुष्याचे सगळे बेत, सगळ्या शक्यता, हे आमचे होते. महेश नसतांना रोज कारने घर ते office
हा प्रवास हे सुद्धा माझ्यासाठी एक अग्निदिव्य झालं होतं. अगं, मी माझ्या आजूबाजूला असलेल्या जगाशी
सबंधच जोडू शकत नव्हते. माझ्याजवळ लक्षच नव्हतं तर मी काम तरी कसे करणार? नोकरी सोडल्यावर,
मला हे स्विकारावं लागलं की मला मदत हवीये, आणि मी मदत स्विकारली. जवळपास, वर्षभर कौन्सेलिंग
केल्यानंतर, मला कुठे मी सापडू लागले आहे. तो म्हणतो, “जगण्याला कारण नसतंच, आपण ते
आपल्या आयुष्यात शोधायचं असतं, आपण करत असलेल्या गोष्टींना त्या त्या वेळेला आपल्या जगण्याचं
कारण बनवायंचं असतं. “
महेश असेपर्यंत सर्वसामान्यासारखं मी पण माझी जगण्याची कारणं, मुलंबाळं, नोकरी, संसार माझ्या
नकळत निर्माण करत होते, जगत होते. पण ती कारणं मी निर्माण केलेली आहे, हे मला कळलं
महेशच्या जाण्यानंतर!
मी तुम्हांला सांगत असलेली सबब नव्हत्या, ते कारण होतं. हे, एवढंच सांगण्यासाठी हे पत्र ! तुला लिहीत
राहीन मी. कारणाशिवाय ! माझं तुला हे पहीलंच कारणासाठी लिहिलेलं पत्र !