Saturday, April 14, 2018

ती आणि गुपितं

 लहानपणापासून तिला गुपितांची मोठी हौस. कुणीही “हे आपलं शिक्रेट आहे बरं कां” असं म्हटलं की तिचे निरागस डोळे “आपल्याजवळ  सगळ्या जगात कुणाचकडे नसलेली सगळ्यात भारी गोष्ट आहे “ असे लकाकायचे. मग ती अगदी “गुपित” मय होऊन जायची, इकडे तिकडे बागडतांना, शाळेत, मित्र-मैत्रिणींबरोबर, घरी दारी भावंडाशी खेळतांना सुद्धा आपलं गुपित जाणवलं की तिला खुदकन हसायची.

बहीणी भावंडाबरोबरची गुपितं असायची, “आज संध्याकाळी शेजारचे काका आपल्याला आईसक्रीम खायला नेणार आहे”, किंवा “उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे मामामामी पण येणार आहे” आणि मैत्रिणीं बरोबरची, “आज मी डब्ब्यात शिरा आणलाय”, किंवा आपल्या बाई काल आमच्या वरच्या काकूंकडे आल्या होत्या.


ह्या गुपितांचे तसे वय तरी किती असणार, काही तासांचे अथवा, काही दिवसांचे! दुसर्या व्यक्तीला भेटल्यावर ही आपली तिच्या डोळ्यात त्यांच्या गुपिताच्या खाणाखुणा शोधू लागे पण त्या व्यक्तीच्या डोळ्यातली त्या गुपिताबद्दलची अनोळख पाहून तिला एकदम रिकामं रिकामं वाटे. कधी कधी तिच्या जपलेल्या गुपिताबद्दल तिला तिसरंच कुणीतरी सांगे, मग आपल्या जवळची, जिव्हाळ्याची गोष्ट दूर गेलीये, आपल्याला सोडून गेलीये अशा विचारांनी ती बावरुन जाई. आणि काही तिची गुपितं तशीचं विरुन जातं. पण ती आणि तिची गुपितं ह्याचं नातं अगदी पक्कं झालं ते ह्याच दिवसांत.


हळूहळू गुपितांची संख्या आणि वयं सुद्धा वाढायला लागली.  
“आपल्या गणिताच्या बाईंचे लग्न ज्युनियर कॉलेज मध्ये शिकविणार्या सरांशी ठरले आहे”
“ त्या तिच्या ऐवजी मला नाचात घेतलं, म्हणून ती माझ्याशी बोलत नाहिये”


ती तिच्या जवळच्या मैत्रिणीला अगदी आपल्या मनातलं खूप जपून ठेवलेलं गुपित सांगायची, खुप उत्साहाने आणि कौतुकानं, अणि दुसर्या क्षणाला तिला जाणवायचं, की ते आता तिचं गुपित “गुपित” राहिलं नाहिये.  स्वत:शिवाय कुणाला तरी सांगितल्या शिवाय, त्या गुपिताचं अस्तित्व तरी कसं मानायचं आणि कुणाला तरी सांगितल्या नंतर ते गुपित, “गुपित” तरी कुठं राहिलं?
मैत्रिच्या नात्याची बांधिलकी त्या व्यक्तीशी असलेल्या गुपितांच्या अनुबंधाची हे ही तिला एका क्षणी कळून चुकलं.
“ब सेक्शन मधला नवीन आलेला मुलगा स्वत:हून माझ्याशी बोलला”
“आपल्या वर्गातल्या तिचं आणि कुणीतरी त्याचं काहीतरी सुरु आहे, मी त्यांना परवा शाळा सुटल्यानंतर बघितलं”


शाळा संपून कॉलेज मध्ये मैत्रिणी बरोबर मित्र पण आले, आता तिची गुपितं म्हणजे तिचा मौल्यवान ठेवा होता. तिला समृध्द करणारा. आणि तिच्या सगळ्या गुपितांमधला मौल्यवान असं म्हणजे तिच्या मनातलं “त्या”चं गुपित“, सगळ्या जपलेलं, रुजवलेलं, व्यवहाराच्या पाणी-पाऊस पासून जीव पणाला लावून सुरक्षित ठेवलेलं असं हे गुपित. तिचं आतापर्यंतच्या आयुष्यातलं सर्वस्वी तिचं असणारं गुपित म्हणजे “तो”!  


काही दिवसांनी “तो” तिचा झाला पण ते तिचं गुपित आता “गुपित” राहिलं नव्हतं आणि तिला पुन्हा रिकामं वाटलं, पण ते दिवस फुलपाखरी होते, ते “रिकामं वाटण्याचं” गुपित तिच्या मनातच राहिलं.

त्याच्या मिठीमध्ये विरघळता विऱघळता, एकदम तिला त्या गुपिताची जाणीव झाली, आणि ती म्हणाली, “ए, तुला माहितीये, आपली गुपितं ना, तार्यासारखी असतात, मनामध्ये लुकलुकणारी, आणि त्यातली काही हळूवारपणे अस्तंगत होणारी”.

तो म्हणाला: “तूच एक गोड गुपित आहे बघं, कळून सुद्धा न कळणारं”, आणि ती खुदकन हसली. इतकी वर्षे गुपितांच्या प्रेमात पडून आता तीच एक गुपित झाली होती.