Saturday, August 9, 2014

चौकट

 इन्ग्रिडने पुन्हा एकदा आपली पर्स चाचपून बघितली. चोरीमारी हा जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या डॉमेनिकन रिपब्लीकन ह्या देशात ती जन्मली आणि वाढली होती, त्यामुळे स्वत:च्या नकळत ती आपली पर्स मिनीटा-मिनीटाला आपल्या जवळच आहे ना, याची खात्री करुन घेत होती. आज सकाळीच तिने बॅंकेमध्ये जाऊन तिच्या खात्यातले उरले-सुरले पैसे काढून आणले होते. नंतर ती ग्वागाजने तिच्या एल वॅले ह्या गावाहून मिचस ह्या पूर्व किनार्यावर असलेल्या गावात आली होती. ग्वागाज म्हणजे सिटी बस आणि शेअर्ड टॅक्सी ला जर एकत्र केलं, तर तयार होणारं वाहन. ती या आधी पण मिचस ला आली होती, पण तिच्या तेव्हाच्या आणि आताच्या मन:स्थितीत ती सोडल्यास काहीच सारखं नव्हतं. 

कसेबसे जमविलेले, दिड हजार डॉलर्स देऊन ती आज आपलं गाव/देश सोडणार होती. गरिबीत जन्म, थोडीफार शाळा शिकली, जमेल ते काम करायचं, पोट भरेल एवढे कसेबसे मिळवायचे, एक तोडकं-मोडकं लग्नं काही काळ तग धरुन होतं, पण तेही इन्ग्रिड च्या ह्या गाव/देश सोडून जाण्याच्या निर्णयाने निकालात निघालं होतं. ह्या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्टीनी कधी इन्ग्रिडची साथ सोडली नाही,  ती म्हणजे दरदिवशी उगवणार्या सूर्यासारखा फिरुन उभा ठाकणारा तो पैशाचा विचार.

वडील तर तिला आठवतच नाही, आईने तिचा आणि तिच्या मोठ्या बहिणीचा, पेनेलोपे चा जीव
असेपर्यंत, जीव पणाला लावून सांभाळ केला. पेनेलोपेने शाळेत असतांनाच तिच्या आईच्या तब्येतीने
त्या दोघींना ह्या उभ्या जगात एकटे करुन सोडले होते. दिवसागणिक घरी येणारा पैसा कमी होत होता
आणि त्या पैशावर अवलंबून राहणाऱ्या गोष्टी मात्र वाढत होत्या. हे मुळातच न जमणारे गणित, त्यात
आईच्या तब्येतीने त्यात हाताशी घ्यायला काहीच उरले नव्हते. इन्ग्रिड ला अजूनही ते दिसवस, त्या
रात्री आठवतात, वयानुरुप परिस्थितीचा पुरेसा अंदाज नव्हता, आईच्या ढासळणाऱ्या तब्येतीचे
गांर्भिय खोलवर जाणवले नव्हते. इन्ग्रिड ला त्या काळात केवळ तिच्या वयाने तारुन नेले. पेनेलोपिचा
मित्र नवरा झालेला आईने पाहिला. जणू आता तिच्या संसाराला आधार मिळाला, ह्या समाधानात
तिने निश्वास सोडला, शेवटचा!  

त्या दोघी बहिणींना जगायला पैसा लागतो, ह्या सत्याला त्यांची तयारी असो वा नसो सामोरे जावे लागत होते. त्यांचे गरिबीच्या चौकटीने जखडून टाकले होते.  पेनेलोपेच्या नवऱ्याने आई गेल्यानंतर १/२ वर्षे अगदी जुजबी कां होईना, तिच्या आयुष्याला टेकू दिला.  आणि मग शाळेच्या शेवटच्या वर्षाला असतांनाच तिला अल्बर्टो भेटला.  पेनेलोपेचा तो कधीच आवडला नाही. पण तिही स्वत:च्या संसाराच्या भविष्याच्या चिंतेत. तिच्या नवऱ्याच्या डोक्यात हा देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन काम शोधायचे हा किडा शिरला होता.  आता आपला देश, आपली बहिण एकीकडे आणि नवऱ्याचे खूळ दुसरीकडे. आणि त्याच वेळी इन्ग्रिडने आपला अल्बर्टोबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव बहिणीसमोर मांडला. पेनेलोपेचा अल्बर्टोला असलेला विरोध तिच्या आयुष्यातील अस्थिरतेने काढून घेतला.  तिने इन्ग्रिडला परवानगी दिली आणि  इकडे नवऱ्याला "तिला बरोबर नेण्याची अट" घातली.

पेनेलोपे कॅनडात पोहोचली हे कळेपर्यंत इन्ग्रिडचे लग्न जुने झाले होते.  वेड्या वयात, वेडी स्वप्नं बघितल्याची किंमत तिला मोजावी लागली.  पेनेलोपेला जाऊनही आता तीन वर्षे होत होती. सहवास नसला तरी  नात्याच्या जवळीकीचा एक चिवट धागा टिकून होता दोघींमधला. जमेल तेव्हा, जमेल त्या मार्गाने त्या एकमेकींशी संवाद साधत. पेनेलोपेचे तिथे अजूनही बस्तान बसत नव्हते आणि तिच्या नवऱ्याच्या अस्थिरतेचा किड्याने पेनेलोपेचा संसार पोखरुन निघाला होता. 

'योला' तयार आहे अश्या गलक्याच्या आवाजानं ती वर्तमानात आली आणि पन्नास/साठ लोकांचा घोळका ज्या दिशेने जात होता, त्यांच्या बरोबर चालू लागली. संध्याकाळची वेळ, अंधाराची पावलं जाणवायला लागली होती, हवेत धूळ आणि त्या बरोबरच मिणमिणत्या दिव्यांचा धूर .. तिला एकदम कोंदटल्यासारखे झाले, पुन्हा आपल्या खोपटात जाऊन पडावे असे तिला क्षणभरासाठी वाटून गेले. पेत्रोने तिला बरोबर फक्त एक कपड्याचा जोड घ्यायला बजावाले होते. ती पिशवी आणि पर्स एवढंच आणि इतकंच तिच्या बरोबर तिची सोबत करत होतं. ती तिच्या बरोबर चालणारे चेहरे बघत होती, पण त्यात एखादा ओळखीचा दिसेल अशी पुसटशी देखील आशा तिच्या मनात नव्हती.

ते एकेकाला 'योला' मध्ये चढवत होते, ती पण चढली. एका बेंचवर बसल्यानंतर तिला काहीतरी सुटल्यासारखं झालं, खुप वेळ रोखून ठेवलेला श्वास सोडावा तसं. तिच्या आयुष्याला असलेली गरिबीची चौकट नाहीशी होतेय असा हळूवार भास तिला झाला. अर्थात त्या स्वप्नात रमून जाणे तिला झेपणारे नव्हते.

"रोखण्यासाठी कुंपण नाही, ओलांडून जाण्यासाठी पूल नाहीत, रस्त्यात तपासण्या करणार्या सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या नाहीत, अनंत मैल पसरलेलं आणि गिळून टाकणारं वाळवंट नाही" असी ज्याची ओळख करुन दिल्या जाते तो जवळपास ८० मैलाचा समुद्रातील "मोना पॅसेज" हिस्पनिओला बेटं आणि उत्तर अमेरिकेच्या पोर्तो रिको प्रदेशांना विभागतो. इन्ग्रिडची "योला' याच मार्गाने तिला अमेरिकेच्या अधिपत्यात असलेल्या पोर्तो रिको ह्या बेटावर सोडणार होती.

हा उणेअधिक २५/३० तासांचा प्रवास, म्हणजे काळाच्या प्रदेशातील प्रवास समजल्या जातो. ह्या प्रवासात सख्ख्या नातेवाईकांना बरोबर घेऊन करु नये असे म्हणतात, कारण जिवंत राहाण्याच्या स्पर्धेमध्ये कोण कुणाच्या जीवावर उठेल ते सांगता येत नाही. बारा-बारा फूट उंचीच्या लाटा, पाण्यात शार्कची संख्या भरपूर, ह्या मार्गावर आधुनिक यंत्रणा नसलेल्या बोटीनी प्रवास करणं, हा दुर्दम्य आशावादाचा नमुना किंवा जगण्याची प्रबळ इच्छेचा पुरावा.

इन्ग्रिडने तो ही प्रवास सहन केला. बोटीला पडलेले भोक, प्रवाशांची एकमेकातली चाकू-सुर्याची मारामारी, पोटात पाणी ही ठरत नाही अशा सगळ्या गोष्टी पचवत तीने एकदाचा पोर्तो रिको च्या जमिनीवर पाय ठेवला. तिचे दैव बलवत्तर की अधिकार्यांच्या नजरेस न पडता  ती निसटली, नाहीतर तिची रवानगी अॅक्वाडिलाच्या सीमा सुरक्षा दलाच्या तुरुंगात झाली असती. सुरवातीचे काही दिवस परीक्षेचे होते, पण तिला domestic worker चे काम मिळाले. एक-दोन महिन्यातच तिथे आलेल्या एका प्रवासी कुटंबाने तिची नगण्य पैशावर काम करण्याची तयारी  बघून आपल्याबरोबर वॉशिंग्टन डी सी जवळच्या उपनगरात तिला नेले. त्यांचे ते महालासारखे घर, त्याच्या मागच्या भागात इन्ग्रिडसाठी एक खोली होती. दोन लहान मुलांना दिवसभर सांभाळणे, आणि बाकी घरकाम करणे, वेळ पडली तर स्वयंपाक करणे. तिची मालकीण मोठ्या हुद्द्यावर होती, दिवसभर कामानिमीत्त बाहेरच असायची. इन्ग्रिडला "गाव म्हणजे कुटुंब" याची सवय, त्या पार्श्वभूमीवर ह्या चार जणांच्या कुटुंबात येऊनही तिला कधी अगदी एकटे पडल्यासारखे वाटे.

तिचा इथे राहणार्या काही नातेवाईकांशी तिचा संपर्क झाला होता. एखा्या शनिवारी/रविवारी ती ट्रेन ने जाऊन त्यांना भेटून येई. तिच्याकडे कागदपत्रे नसल्याने तिला एकटीला फारसे कुठे जाता येणे शक्यच नव्हते, कार शिकावी असे एकदोनदा वाटले पण परवाना मिळणार नाही हे ठाऊक असल्यामुळे मनातल्या त्या विचाराला तिने थारा दिला नाही, स्वत:ला रोजच्या कामांमध्ये बुडवून घेतलं, मुलंही अगदी लहानपणापासून तिच्याजवळ वाढली असल्याने, त्यांना तिचा लळा होता, एकूणात काय आयुष्य मार्गाला लागले होते, स्वस्थतेची, समृध्दीचा स्पर्श तिच्या आयुष्याला झाला होता.

काही वर्षे गेली, इन्ग्रिड आता खर्या अर्थाने स्थिरावली होती, ह्या आयुष्याला. दोन्ही मुलं आता मोठी झाली होती, हायस्कूल मध्ये जायला लागली होती, ती घरात एकटीच. मागच्या रविवारी तिच्या नातेवाईकांशी बोलतांना, पेनेलोपेचा विषय निघाला, आणि तिला एकदम भरुन आलं. ती आजारी असल्याचं कळलं होतं, इतके वर्ष वर्तमानाशी नातं नसलेलं ते नातं, जिवंत झालं. जगण्यातली असोशी तिला जाणवली, कसंही करुन, काहीही करुन आपल्या बहिणीला भेटावं, असं इन्ग्रिडला प्रकर्षाने वाटलं. सुट्टीचा प्रश्न नव्हता, पैशाचा प्रश्न ही सुटण्यासारखा होता, पण आतापर्यत अगदी डोळ्यासमोर असूनही जे सत्य ती नाकारत होती, ते तिच्या समोर येऊन ठाकलंच, केवळ भेटावंसं वाटतंय, हे पुरेसं नाही, तो देश सोडलाय, पण हा देश काही माझा नाही, रोजच्या आयुष्याचा प्रश्न सुटला होता, पण  तरिही आयुष्य सर्वाथाने माझे नाही, एक महत्वाचा कागद, ओळखपत्र तिच्याकडे नव्हते. ती अधूनमधून करित असलेला त्या ट्रेनच्या प्रवासापलिकडे इन्ग्रिडचे ओळखपत्राशिवाय जाणे धोक्याचे होते. ती जाणार तरी कशी?

इतकी वर्ष तिला वाटायचे, आपण त्या गरिबीच्या चौकटीतून बाहेर पडलो, आता पुढे मोकळं आकाश, आपल्या हातात न मावणारं!  पण आज पु्न्हा एका नविन चौकटीची जाणीव झाली तिला, आणि त्या चौकटीच्या भाराने ती हतबल झाली.

त्या एका  गरिबीची चौकट मोडता मोडता सारं आयुष्य खर्ची पडलंय, हे जाणवलं. एक चौकट मोडून आयुष्य मोकळं होत नसतं, पुन्हा पुन्हा हाच प्रवास, वेगवेगळ्या चौकटी मोडून काढण्यासाठी करावा लागतो,  ह्या सत्याची बोचरी तिला जाणीव झाली, आणि तिने पुन्हा एकदा सगळे बळ एकवटले, आणि तिच्या मालकीणे कडे जाऊन उभी राहीली, तिच्या कागदपत्रांबाबत काही करता येईल कां हे विचारण्यासाठी !!

Sunday, June 22, 2014

भूक

(मूळ कविता:  Hunger by Robert Binyon)

मी सावली सारखी माणसांबरोबर राहते,
प्रत्येकाच्या बाजूला नेहमी बसलेली असते.
कुणी मला पाहू शकत नाही,
पण ते एकमेकांकडे पाहतात,
आणि मला माझं अस्तित्व जाणवतं.

माझी शांतता ही खेळणाऱ्या मुलांच्या 
क्रिडांगणाला गिळंकृत करणाऱ्या
एखाद्या भरतीच्या लाटेसारखी !
एखाद्या संथ रात्री अविरत पडणाऱ्या
आणि पक्षांची कलेवरं आपल्यात
सामावून घेणार्या विखारी बर्फासारखी !

शक्तीशाली सैन्य जे आकाशातून आणि हवेतून आपल्या
धुवांधार गोळीबाराच्या पावसात, शत्रूची दाणादाण, नायनाट करतं, 
मी त्या सैन्यापेक्षाही भयंकर, घणाघाती तोफेपेक्षाही भयानक !

राजे, सम्राट देतात आदेश,
जो मी कधीच आणि कुणालाच देत नाही,
पण तरिही तो पाळला जातो प्रत्येकाकडून 
एखाद्या अत्यंत प्रभावी वक्त्यापेक्षा,
मी न दिलेली हाक ऐकल्या जाते जन्माला आलेल्या प्रत्येकाकडून !

मी शपथा विसरायला लावते,
मी दिलेलं देणं परत घ्यायला लावते,
नग्न सत्य मला जवळून ओळखते,
मी पहिली आणि शेवटची जिंवतपणाची खूण,
मी भूक !

(लमाल जून २०१४)

Saturday, April 12, 2014

पसारा

तिच्या दरवाज्यातून आत आल्यावर जेमतेम दोन ते तीन व्यक्ती कशाबशा उभ्या राहू शकतील एवढीच
मोकळी जागा. चपलांच्या स्टॅण्डवरच्या चपला/सॅण्डल्स/शूज आपल्या जागेवरुन सरकत सरकत
पसरलेल्या. त्यामधून वाट काढत काढत सोफ्यापर्यंत पोहचण्यासाठी वाटेत पुस्तकांचे ढिग, १/२
इनडोअर प्लॅन्टस, भिंतीवर चढून जाण्याची आशाळभूतपणे वाट पाहणारी खाली जमीनीवर
ठेवलेली निरनिराळ्या आकाराची, प्रकारची पेटिंग्स, काही फोटो, देशविदेशात भटकतांना
आवर्जून त्या-त्या देशाचे वैशिष्ट असलेल्या आणि म्हणून खरेदी कराव्याशा वाटलेल्या वस्तू
तर कधी सांगण्यासारखे काहीही कारण न नसतांना, केवळ वाटले विकत घेतलेल्या गोष्टी,
काही चित्र-विचीत्र खेळणी,  पुतळे, कोरीव कामाचे नमुने असा सगळा भरलेला मुलुख ओलांडून
मग सोफ्यावर तुम्ही बसू शकाल, अर्थात त्यावर कागद, कात्रणं, संगीताच्या CDs, नवी/जुनी
पत्रं यातलं आणि असं काही तिथे आधीच नसेल तर.
कॉफीटेबल वर तर वस्तू हक्काने बसलेल्या असतात, कारणं त्या टेबलाचा मूळ उद्देशच मुळी वस्तू
ठेवण्याकरता.
रद्दीसाठी म्हणून काढलेले वर्तमानपत्राचे गठ्ठे असतात, कुणाला तरी द्यायची अशा पुस्तकांचे
वेगळे ढिग असतात, कुणा जवळच्याला मोठ्या उत्साहाने दाखवायला आणलेले फोटो
अलब्मस तिथेच त्यातल्या आठवणींसकट रेंगाळत असतात, नदीकिनारी सापडलेले स्पर्शसंवेदना
जागविलेले दगड असतात, पुन्हा तशाच स्पर्शाची वाट बघत पहुडलेले, कधीतरी भटकतांना
उडण्याची स्वप्नं दाखविणारं, पक्षाचं रंगीत पीस असत, आपल्या अंगावर ऋतुंच्या खाणा-खुणा
मिरवलेली वाळलेली झाडांची पानं असतात आणि कोपर्यातल्या क्लिपबोर्डवर तर एकावर एक
आयुष्यातील पुटंच्या पुटं चढलेली. कधीतरी त्यातला एखादा तुकडा खुणावून हसतो.

ह्या गच्च भरलेल्या घरात एका उतरत्या दुपारी ती सोफ्याच्या एका कोपर्यात बसून शांतपणे
लिहीत असते, तिच्या कादंबर्यातील पात्रांच्या मनातील विचारांचा पसारा सराईतपणे
कागदावर उतरवत, आवरत जाते, हळूहळू सूर्यप्रकाश मंदावत जातो,  पेटिंग्स,
फोटो आणि इतर गोष्टी मधून उरलेल्या भिंतीवर सावल्या लांबत जातात, आजूबाजूलाच्या
पसार्यातून विखुरलेल्या तिच्या अस्तित्वाची आणि लिहिता लिहीता आतील आवरासावरीची लय
जमून जाते.

(लमाल एप्रिल २०१४)

Saturday, February 8, 2014

ध्यासपर्व

"मला लग्न झाल्यावर कमीत कमी तीन वर्षे तरी मुलं नकोयत, मला नवऱ्याबरोबर फ्रेंड टाईम हवाय", असं जेमतेम विशीची अंजू म्हणाली तेव्हा तिचं ते वाक्य खूप liberating वाटलं, निर्णय काय/कसा/योग्य/अयोग्य ह्या पेक्षा तो घेण्याची  इच्छा/ विचारक्षमता आहे हे मोलाचं. "चूल आणि मूल" ही गेल्या कितीतरी शतकं स्त्रियांची क्षेत्रं असूनसुद्धा त्या क्षेत्रांसबंधी किती खोलवर विचार सामान्य स्त्री कडून केल्या जातो असं मनात आलं, आणि त्याच क्षणी मनात आला तो "उद्याचा पुरुष" अर्थात "रधों" !

काळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा, लहानपणी वडीलांचे कुणाला तरी सांगितलेले "विसावे शतक हे विज्ञानाचे, ज्ञानाचे असेल" हे उदगार कानावर पडले आणि आयुष्यभर मग विज्ञानाची, ज्ञानाची कास आणि समाजाला काळाच्या पुढे न्यायचा ध्यास! 

व्यवसायाने गणिताचे प्राध्यापक असलेले रधों, आयुष्यभर आपल्या पत्नी, मालती बरोबर समाजाला कळत नसलेला किंबहुना झेपत नसलेला म्हणून सतत हेटाळणी/उपहासाचे कारण असलेला समाजसुधारक विचारांचा प्रसार करत झटत राहिले. ज्या समाजासाठी आपण हे करतो आहोत त्या समाजाकडून अपमान, निंदा सहन करत. 

आपण आपले अनुभव, विचार, मतं एवढंच नाही अगदी रोजच्या जीवनातल्या लहान-सहान घटना शेअर करण्यासाठी केवढी विवीध माध्यमं वापरत असतो सतत. कुठल्याही पातळी वरचा एकटेपणा आपण आपल्या नकळत टाळत असतो. त्यामुळेचा हा एकाकी प्रवास समजून घेणे अधिकच अवघड होऊन बसतं.

त्या काळात "१००% ridiculous" अशा शब्दात ज्याची बोळवणं करता येईल अशी "कुटुंब नियोजना"ची कल्पना! तिचा खोलवर अभ्यास करुन, तिचे समाजाच्या वाटचालीतले अनन्यसाधारण असे महत्व जाणून घेऊन, त्या गोष्टीचा स्वत: चालविलेल्या "समाजस्वाथ्य" ह्या मासिकातून तसेच घराघरात जाऊन प्रसार  करणं. रधों आणि मालती यांनी सुरुवातीपासूनच मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे ह्या लढ्याला वैयक्तिक स्वार्थाची कारणं काहीही नाहीत.

"त्या रबरी फुग्यात कितीतरी शिवाजी/ज्ञानेश्वर वाहून गेले असतील" असल्या इरसाल/कडव्या विरोधांचा समाज. आणि तेव्हा स्त्रीला किती आणि केव्हा मुलं हवीत हे ठरविण्याचाच अधिकार असावा, हे नुसतं धाडसाचंच नाही तर वेडगळपणाचं वाटावं. 

त्यावेळच्या समाजातील स्त्रिची उपेक्षित आणि दुय्यम अशी भूमिका लक्षात घेता, हे काम/ हा वेडगळपणा नक्की कोणत्या प्रेरणेने केले असेल किंबहुना जी गोष्ट फक्त आपल्याला दिसते आहे, पटते आहे, त्याचा आयुष्यभर पाठपुरावा करणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या समाजासाठी हे सगळं करायचं, त्या समाजाला ही गोष्ट आपल्यासाठी, आपल्या स्वाथ्यासाठी आहे ही जाणीवही कोसो दूर! त्यामुळे ह्या प्रवासात समाजाकडून वाट्याला आली ती फक्त अवहेलना, उपहास आणि निंदा! 

जवळपास एकाकीपणाच्या अंधारातूनच हा त्यांचा प्रवास सुरु होता. अपवाद अर्थातच काही मोजक्या समविचारी लोकांचा, समाजसुधारकांचा. पण काळाच्या पुढे जाऊन विचार करणे म्हणजे नक्की डोळ्यासमोर काय दिसत असतं? त्या द्रष्ट्या दृष्टीसमोर कोणता प्रकाश असतो तो ह्या एकाकी प्रवासाचा मार्ग उजळून टाकतो? तो प्रकाश आयुष्यभर तेवत राहावा ह्या साठी नेमकी कोणती शक्ती त्यांच्यात असते? सध्या काळाच्या वेडेपणातच उद्याच्या काळासाठी लागणारे शहाणपण आहे हे कसं कळतं? आणि ते शहाणपणं कळलेले फारसे कुणी बरोबर नसतांना, आयुष्याच्या शेवटापर्यंत स्वत:च्या आयुष्याचा अर्थ बनून कसं जगता येतं?

"ध्यासपर्व" बघितल्या नंतर असे अनेक प्रश्न आपल्याला अस्वथ्य करत राहातात. स्वत:च्या कोत्या आयुष्यात गगनभरारी चे स्वप्न ओझरते झिरपते मनात ते ह्या द्रष्ट्या लोकांमुळे,  काळाच्या परिमाणांना नविन अर्थ देणाऱ्या रधोंमुळे !

(लमाल फेब्रुवारी २०१४)