Saturday, October 14, 2017

विरोधाची ठिणगी

शेवटी स्वत:तल्या धुगधगलेल्या विरोधाच्या प्रत्येक ठिणगी चे आत्म-परिक्षण गरजेचे. कारण बरेचदा ती ठिणगी पेटलेली असते ती आपल्याच आणि स्वत:चा भाग आहेत असे वाटणार्या संस्कारांवर, आपल्याच वाटणाऱ्या रुढींवर. आपल्या गोष्टी आपल्याच विरोधात कशा काय जाऊ शकतील, हा प्रश्न समजून घ्यायला तिला किती वेळ लागला होता. स्वत:च्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींना विरोध आणि तिच्या विरोधाला अगदी मुळापासून उपटून टाकण्याची पुरेपुर तयारी असणारा आजूबाजूच्या व्यक्तींचा विरोध.

तिची परिस्थीती ही कित्येक जणींपेक्षा किती चांगली आहे, आणि त्या परिस्थीतीशी जुळवून न घेता येणं, हे तिला कसं मारक आहे,  हे तिला वेगवेगळ्या पद्धतींनी आणि वेगवेगळ्या लोकांकडून सांगण्यात येई. सुरुवातीला तिचे अथक प्रयत्न सुरु असत, सगळं मनाआड करुन, संवाद साधायचा, काहीतरी बदलेलं, किमान किमान मला स्वत:चा आवाज आहे, ह्याची तरी दखल घेतली जाईल, असं वाटायचं.  

तरिही, कुठल्यातरी गाफील क्षणी, धगधगत्या निखाऱ्यावर पाय पडावा तसे उपेक्षेचे उद्गार ऐकावे लागत, आणि आपण का ऐकून घेतो आहोत, हा तिचा आतला आवाज तिला ऐकवी. तो कसा बंद करावा हे तिला कळेना. दिवसेंदिवस त्या आवाजाला बंद करणं म्हणजे स्व:त पासून दूर जाणं, कुठलातरी मुखवटा घालून जगणं, किंवा दुसऱ्या कुणाची तरी भूमिका वठवण्यासारखं तिला वाटू लागलं. तिची सहनशक्ती तिच्या कल्पेनेपेक्षा किती तरी पटींनी जास्त होती.

कारण मुळातच विरोधाचे मूळ हे विचारात आहे. रोजच्या आयुष्यातल्या बहुतांशी गोष्टी काही विचार न करता पार पाडल्या जातात, त्या करायच्या असतात म्हणून इतरही अनेक लोक करत असतात, आणि समूह जीवन सुरु असते. तरिही, तिचा चिवट विरोधी आवाज तिच्यावर होणार्या अन्यायाची आणि त्या ही पेक्षा ती तिच्या आयुष्यातून तिला हवे ते मिळवू शकते, मागू शकते हे तिला सांगू लागला.

तिला कुणावर वरचढ व्हायचे नव्हते, तिला ती कुणापेक्षा ती चांगली आहे हेही पटवायचे नव्हते, तिला तिचा श्वास खोलवर हुंगून घ्यायचा होता, सतत कुणाच्यातरी पावतीची तमा न बाळगता. काहीबाही वाचनात यायचे, त्या आपल्या आयुष्याशी, वर्तमानाशी सांगड कशी घालावी, ते तिला कळायचे नाही. “एक स्त्री म्हणून हे केलेच पाहीजे, असे काहीच नसते. कारण तू स्त्री आहेस, हे कधीच कशाचेच कारण होऊ शकत नाही”. आणि इथे तर प्रत्येक वेळी “तू स्त्री आहेस” हे तिच्या आवाजाला गप्प करतांनाच नव्हे तर तिच्या जगण्याचे कारण झाले होते.

शेवटी आतला आवाज हे सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे, स्व:ताच्या अस्तित्वाच्या उभारलेल्या लढ्यासाठी !

रात्रीचे बारा  वाजून गेले होते. ती एकटीच त्या तिला अजूनही अपरिचित असलेल्या वास्तूच्या मागच्या अंगणात आली. बरोबर २४ तासांपूर्वी ती एका सुखवस्तू घरात, आरामदायी पलंगावर पहुडलेली होती. अर्थात त्या वेळी ही तिचे चित्त थाऱ्यावर होते असे मुळीच नाही. पण ज्या एका विचाराने, ती गेले कित्येक महिने पछाडलेली होती, झपाटलेली होती, त्या विचाराप्रमाणे तिने कृती केली होती. इस पार चे उस पार चा तिचा प्रवास झाला होता. समोर चा प्रवास तिची अनुमती नसतांना पुढे ठाकला होता, तिला सर्वस्वी नवीन असलेल्या आव्हांने घेऊन, मस्तक भारुन टाकणाऱ्या अडचणींचे झेंडे फडकवत तिचे भविष्य तिच्या समोर उभे होते.