Saturday, December 9, 2017

लमाल लिखाण: काही हमखास उपाय

आज ज्या समस्येबद्दल मी सांगणार आहे, ती समस्या तशी गंभीर आहे, लमाल सत्रामध्ये भाग घेण्यार्या सगळ्यांनाच ही भेडसावते असे नाही, पण काही थोडक्या लोकांना वेळच्या वेळी कामे करणे किंवा लिखाणासाठी वेळ वेगळा काढणे ह्या असल्या वाईट सवयींमुळे ह्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. “गंभीर” ह्यासाठी की एकदा सवयीचा गुलाम झाल्यावर अंगात बेशिस्त बाणविणे कठीण होऊन बसते.


म्हणूनच तर मी माझी अत्यंत महत्वाची कामे सोडून हे लिहायला बसले आहे. अत्यंत महत्वाची कामे यांत व्हॉटसऍप वरचे सगळ्या ग्रुपवरचे सगळे ज्योक्स वाचणे एवढेच येत नसून फेसबुक वर रॅण्डम लोकांनी टाकलेले  रॅण्डम विडीओज बघणे, कुणाचे तरी टॅग केलेले फोटो बघत बघत, ह्याच्या त्याच्या पेजवर उड्या मारत, शेवटी सुरुवात कुणाच्या फोटोवरुन केली होती हेच विसरून जाणे, तसेच इतर लोकांना आवडलेले कपडे, फोटो, फुलं, पाने ह्यासाठी आपली नसलेली आवड दाखविणे, हजारदा वाचलेलं जीवनावश्यक तत्वज्ञान दरवेळी वाचतांना पहिल्यांदाच वाचतोय आणि क्षणात आपलं आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी कशी बदलली ह्या अनुभुतीची पुनरावृत्ती घेणे, हे आणि असे इतर सगळे आले.


तर ही समस्या आहे, लमाल सत्रा मध्ये वेळेवर लिखाण करण्याची.


लिखाण कसे करावे ह्या बद्दल तुम्हाला हवी तितके उपाय सांपडतील पण लिखाण न करण्यासाठी मात्र तुम्हांला माझ्या ह्या अभिनव उपायांचीच मदत घ्यावी लागेल.


पहिल्या प्रथम, लमाल सत्राअखेरीस पुढच्या सत्राच्या विषयाची निवड झाल्यानंतर, एकंदरीत लिखाणा/लेखन या बद्दलचा तुमचा जो काही उत्साह असेल, तो लगेच पुढच्या तासाभरात त्यावर वाटत असलेले, नसलेले सगळे विचार बोलून दाखवून वापरुन टाकावा. आपण आतापावेतो (न) केलेल्या लिखाणाचा किंवा वाचनाचा आणि आपण बोलत असल्याचा काहीएक सबंध नाही हे पक्के लक्षात ठेवावे. त्या तुमच्या उत्साहावरुन तुम्ही पुढच्या लमाल सत्राला हातासरशी एक दीर्घकथा, जाता येता एखादी गोष्ट किंवा निदान एखादा भरभक्कम लेख तरी नक्की लिहालच अशी इतरांची तशीच तुमची पण खात्री पटते. मग त्या दिवशी घरी जाऊन आदल्या दिवशी जे वेळेवर लिखाण केलं असतं त्यामुळे आणि पुढच्या सत्राच्या लिखाणाबद्दल (अति) उत्साहाने बोलण्यामुळे  अतिशीण येऊन “खूप झाली बाबा मराठी साहित्यसेवा” असं म्हणत “हाश्श हुश्श” करीत राहावं, ते थेट लमाल पदाधिकार्यांची लमाल सत्राला ३/४ अाठवडे राहीले आहेत, अशी इ-मेल येईपर्यंत.


आता ह्या ठिकाणी, तुम्हांला मनाचा निग्रह करुन, ती ई-मेल पाहून तात्काळ न वाचता ती मेल जणू आलीच नाहीये, आणि तुम्ही ती पाहिलीच नाही असे स्वत:ला सांगायचे आहे. सुरुवातीला असे पाहून न पाहणे कठीण वाटेल, पण जमेल हळू हळू. एकदा ह्या ई-मेल कडे तुम्ही दुर्लक्ष करु शकलात की तुम्ही “न लिहीणे” चा अर्धा गड जिंकलात.


पुढचे २/३ आठवडे जातील, पण पुन्हा अत्यंत महत्वाच्या कामांमुळे तुम्ही लमाल चा विषय मनातसुद्धा न आणता बिनधोक पणे जगू शकता. चुकुन माकून त्याची अाठवण झालीच, तर आपले तावातावाचे उत्साहाने बोलण्याच्या आठवणीत रमून जावे आणि  “लिखाणाचा विषय अाणि त्यावर विचार” ह्या असल्या क्षुल्लक गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.


लमाल सत्राला एक आठवडा उरला असतांना पुन्हा एकदा लमाल पदाधिकार्यांची RSVP ची इ-मेल येईल. मग आठवड्यातला किंवा विकेंडच्या एखाद्या शुभ दिवशी दिवसभर हाईकिंग, भटकंती, बोर्डगेम्स आणि काहीच न जमल्यास नेटफ्लीक्स वर कुठल्या तरी शोचे बिंज वॅाचिंग करणे, या सगळ्या कामानंतरच रात्री खुप उशीरा लमाल सत्राच्या विषयाबद्दल सुमारे दोन ते तीन मिनीटे विचार करावा. एकंदर वेळ आणि परिस्थिती बघता, काय लिहावे याबद्दल काही सुचणार नाही, मग गुगलं शरणं गच्छामी ह्या सवयीप्रमाणे लमाल सत्राच्या विषयासाठी गुगल सर्च मारावा. हो जसा सर्च लाईट चा झोत मारतात, तसा हा सर्च ही मारतात. त्यामुळे तो कधी कधी लागतो. आणि डोळे ताणत ताणत इंग्लिश/ हिंदी/मराठी अशा सगळ्या भाषेतले भांडार गुगलने उधळले असते त्यात नक्की आपण काय शोधत आहोत यांचाच विसर पडतो, मग ताबडतोब, काहीतरी लिहीण्याचा मोह होण्याच्या आत, पटकन लॅपटॅाप बंद करुन झोपी जावे.


पुढचे २/४ दिवस जगातले इतर सगळे विषय कसे आपल्या सर्जनशीलतेला पूरक आहेत आणि ह्यावेळेला निवडलेला विषय कसा मारक आहे याची जाणीव स्वत:ला करुन देण्याचा प्रयत्न वारंवार करावा. लिहायचे आहे ह्याचे दडपणही वाटू शकेल, पण घाबरुन जायचे कारण नाही. अशावेळी सत्र कुणाकडे आहे, जायला किती वेळ लागेल, मेनू कसा असेल, कोण येईल, कोण नाही असे विचार मदतीला येऊ शकतात. किंवा जवळच्या लोकांकडे विषयाच्या निवडीबद्दल चे आपले अवेळी जाणवलेले असमाधान मनसोक्त व्यक्त करावे.


मग सत्रास दोनच दिवस उरले आहेत, अशी वेळ येऊन ठेपते. बघा, आतापावेत्तो, जमलं की नाही न लिहीणं?


आता मात्र लिहीण्या शिवाय काहीच तरणोपाय नसतो मग लमाल सत्राच्या आदल्या रात्री किंवा सत्र दुपारी असेल तर दुसर्या दिवशी सकाळी लिहायला सुरुवात करावी. सरस्वती आपल्या हाकेची वाटच बघतेय हा आपला भ्रम लगेचच खोटा ठरेल, तरी सुद्धा घाबरायचे नाही.


सुरुवातीला विषयाशी यमक जुळणारे शब्द लिहून बघावे. जर आठ एक ओळींची कविता त्या निघाली तरी काम फत्ते.  कविता लिहीण्याचे बरेच फायदे आहेत. या ठिकाणी कविते साठी “करणे” च्या ऐवजी “लिहीणे” हे क्रियापद वापरलेले आहे हे आपल्या चाणाक्ष नजरेस आलेच असेल. तर कविता लिहीण्यास वेळ कमी लागतो तसाच कविता वाचण्यास पण. त्यामुळे कविता सगळ्यांच्या आवडीची. त्यात कविता समजणे म्हणजे ते मारुतीच्या बेंबीत गार लागतंय सारखा प्रकार, त्यामुळे, ती कशी चांगली होती किंवा नव्हती ह्याबद्दल कुणी खोलात जाऊन बोलत नाही.   


कविता नाही जमली तर मग तो काल रात्रीचा गुगल सर्च चा टॅब  पुन्हा बघावा, आणि त्यात अजिबात नसलेलं,
आणि मनाच्या कोपर्यातलं काहीतरी खरडवून काढून लिहावं. आणि “चला बाबा झालं एकदाचं” म्हणून अतीव समाधानाचा निश्वास टाकावा. कारण इतर काही करण्यासाठी वेळच उरलेला नसतो, त्यामुळे तुम्ही एवढंच करु शकता.


असे वेळेवर लिखाण केल्यामुळे सगळ्यांसमोर ते लिखाण ताजे ताजे सादर करता येते. ते जर गुगल ड्रॉइव वर टाईप केलेले नसेल तर हस्ताक्षरामुळे त्याला एक प्रकाराचा जिव्हाळ्याचा पदर जाणवतो. तसेच त्या लिखाणाला पुनर्वाचन, सुधारित वाक्यरचना, क्रियापदांच्या योग्य रुपांचा वापर असल्या दांभिक सुधारणांचा वासही येत नाही.  तर हे होते, “ वेळेवर लमाल लिखाण करणे” ह्या समस्येवरील उपाय. आपण जरुर हे उपाय अंमलात आणू शकता आणि आपले लिखाण ताजे, गरम बनवू शकता, पहिल्या (न) जमलेल्या तळणाच्या घाण्यासारखे !

Saturday, October 14, 2017

विरोधाची ठिणगी

शेवटी स्वत:तल्या धुगधगलेल्या विरोधाच्या प्रत्येक ठिणगी चे आत्म-परिक्षण गरजेचे. कारण बरेचदा ती ठिणगी पेटलेली असते ती आपल्याच आणि स्वत:चा भाग आहेत असे वाटणार्या संस्कारांवर, आपल्याच वाटणाऱ्या रुढींवर. आपल्या गोष्टी आपल्याच विरोधात कशा काय जाऊ शकतील, हा प्रश्न समजून घ्यायला तिला किती वेळ लागला होता. स्वत:च्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींना विरोध आणि तिच्या विरोधाला अगदी मुळापासून उपटून टाकण्याची पुरेपुर तयारी असणारा आजूबाजूच्या व्यक्तींचा विरोध.

तिची परिस्थीती ही कित्येक जणींपेक्षा किती चांगली आहे, आणि त्या परिस्थीतीशी जुळवून न घेता येणं, हे तिला कसं मारक आहे,  हे तिला वेगवेगळ्या पद्धतींनी आणि वेगवेगळ्या लोकांकडून सांगण्यात येई. सुरुवातीला तिचे अथक प्रयत्न सुरु असत, सगळं मनाआड करुन, संवाद साधायचा, काहीतरी बदलेलं, किमान किमान मला स्वत:चा आवाज आहे, ह्याची तरी दखल घेतली जाईल, असं वाटायचं.  

तरिही, कुठल्यातरी गाफील क्षणी, धगधगत्या निखाऱ्यावर पाय पडावा तसे उपेक्षेचे उद्गार ऐकावे लागत, आणि आपण का ऐकून घेतो आहोत, हा तिचा आतला आवाज तिला ऐकवी. तो कसा बंद करावा हे तिला कळेना. दिवसेंदिवस त्या आवाजाला बंद करणं म्हणजे स्व:त पासून दूर जाणं, कुठलातरी मुखवटा घालून जगणं, किंवा दुसऱ्या कुणाची तरी भूमिका वठवण्यासारखं तिला वाटू लागलं. तिची सहनशक्ती तिच्या कल्पेनेपेक्षा किती तरी पटींनी जास्त होती.

कारण मुळातच विरोधाचे मूळ हे विचारात आहे. रोजच्या आयुष्यातल्या बहुतांशी गोष्टी काही विचार न करता पार पाडल्या जातात, त्या करायच्या असतात म्हणून इतरही अनेक लोक करत असतात, आणि समूह जीवन सुरु असते. तरिही, तिचा चिवट विरोधी आवाज तिच्यावर होणार्या अन्यायाची आणि त्या ही पेक्षा ती तिच्या आयुष्यातून तिला हवे ते मिळवू शकते, मागू शकते हे तिला सांगू लागला.

तिला कुणावर वरचढ व्हायचे नव्हते, तिला ती कुणापेक्षा ती चांगली आहे हेही पटवायचे नव्हते, तिला तिचा श्वास खोलवर हुंगून घ्यायचा होता, सतत कुणाच्यातरी पावतीची तमा न बाळगता. काहीबाही वाचनात यायचे, त्या आपल्या आयुष्याशी, वर्तमानाशी सांगड कशी घालावी, ते तिला कळायचे नाही. “एक स्त्री म्हणून हे केलेच पाहीजे, असे काहीच नसते. कारण तू स्त्री आहेस, हे कधीच कशाचेच कारण होऊ शकत नाही”. आणि इथे तर प्रत्येक वेळी “तू स्त्री आहेस” हे तिच्या आवाजाला गप्प करतांनाच नव्हे तर तिच्या जगण्याचे कारण झाले होते.

शेवटी आतला आवाज हे सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे, स्व:ताच्या अस्तित्वाच्या उभारलेल्या लढ्यासाठी !

रात्रीचे बारा  वाजून गेले होते. ती एकटीच त्या तिला अजूनही अपरिचित असलेल्या वास्तूच्या मागच्या अंगणात आली. बरोबर २४ तासांपूर्वी ती एका सुखवस्तू घरात, आरामदायी पलंगावर पहुडलेली होती. अर्थात त्या वेळी ही तिचे चित्त थाऱ्यावर होते असे मुळीच नाही. पण ज्या एका विचाराने, ती गेले कित्येक महिने पछाडलेली होती, झपाटलेली होती, त्या विचाराप्रमाणे तिने कृती केली होती. इस पार चे उस पार चा तिचा प्रवास झाला होता. समोर चा प्रवास तिची अनुमती नसतांना पुढे ठाकला होता, तिला सर्वस्वी नवीन असलेल्या आव्हांने घेऊन, मस्तक भारुन टाकणाऱ्या अडचणींचे झेंडे फडकवत तिचे भविष्य तिच्या समोर उभे होते.

Saturday, August 12, 2017

तशी मला भीती वाटत नाही पण


आजकाल कुठल्याही घटनेकडे बर्याचदा स्वत:च्या संदर्भातून विचार करतांना परंपरा/आजूबाजूला असणार्या व्यक्तींचे विचारप्रवाह/ वाचलेल्या गोष्टींमधून कळत नकळत घडले गेलेले संदर्भ ह्या सगळ्या गोष्टींना पार कडून स्वत:पर्यंत पोहचण्याचा बरेचदा अयशस्वी पण प्रयत्न सुरु असतो. अर्थात स्वत: पर्यत पोचल्यानंतर काय दिसेल हे अनपेक्षीतच. मग एक मजेदार सामना सुरु होतो स्वत:शी.

कधीतरी मी आशिषबरोबर पालोमार observatory माऊंटन गेले होते. जय भारतात! ही observatory Palomar State Park आहे, म्हणजे जंगलातच!

दुपारी मी एकटीच monastery च्या मागच्या भागात झाडांना सोबतीला घेत, थोडीशी फिरले आणि एक छानशी जागा पाहून नुकतेच भारतातून आणलेलं पुस्तक वाचलं. अर्थात मनावरची बंधन/आवरणं सहजपणे गळून पडावीत अशी ती वेळ. मी पुस्तकांमधील एक-दोन वाक्यं डोळ्याघालून घालावीत, पण त्यांच्या अर्थाचे तरंग मनात उमटुच नये अशी आजूबाजूला वातावरणाची मोहीनी, असा सगळा आसमंत मी मनसोक्त मनात उतरवून घेतला.

संध्याकाळी आशिष परत आला, obersavations मुळे रात्रीचं जेवण ५ वाजताच करुन observatory ला गेलो. बराच वेळ internet surfing, दक्शिणरंग वाचन यांच्या सोबतीला घालवून सुद्धा तिथे जास्ती वेळ बसणं कठीण झालं. Obsevatory ते monastery  अगदीच अर्धा किलोमीटर अंतर, पण बराच उशीर झाला होते, म्हणून आशिष म्हणाला पोहचवून देतो तुला. आम्ही दोघं dome च्या बाहेर आलो,   आणि मी पाऊल बाहेर ठेवताच, मी फक्त ओरडण्याची बाकी राहीले होते. इतका मिट्ट काळोख. काळोख ह्या शब्दाचा अर्थ जाणवला त्या क्षणाला. Observatory असल्यामुळे आजूबाजूला अजिबात दिवे नसतात, आणि ऊंचीवर, जंगलात. आशिष ने कार सुरु केली आणि परिसर कार च्या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. Monastery नावाप्रमाणेच आहे, १२ खोल्यांची ही building! खोल्यांमध्ये आतुन एक नावापुरती कडी, मात्र बाकी दारं सदैव उघडी ! अाणि माझ्या सुदैवाने(!) त्या दिवशी, रात्री तिथे माझ्या शिवाय कोणीही नव्हतं.  आशिष तर परत निघून गेला. मी आपली monastery च्या दुसर्या मजल्यावरच्या कोपर्यातल्या खिडकीत “वह कौन थी” स्टाईल ने उभी, आशिष ला बाय करत.

खरंतर मला तशी भिती वाटत नाही, पण त्या भावनेला नक्की काय म्हणावं हे ही कळेना. आपल्याला नक्की काय वाटतेय, याचं उत्तर आलं, तेच आलं, भिती !

कां वाटतेय: मी एकटी आहे!
म्हणजे काय: एक जंगल आहे, हो मोठे घर आहे, त्यात मी एकटी आहे, सगळ्यात जवळच दुसरं घर/building अर्धा किलोमीटर अंतरावर.
काय होईल असं वाटतंय: भुतं येतील? इकडे कां येतील? इथे असे माझ्यासारखे कित्येक जण येऊन राहत असतात.
चोर येतील? त्यांना कुठे माहित मी इथे आहे ते. मग आजच कां येतील?
ही जागा नवखी आहे, म्हणून भिती वाटते, पण मग ह्याच जागेत दुपारी इतके रम्य क्षण घालवलेस तेव्हा नव्हती ही जागा अनोळखी? नवखी?
…….
आणि अशा तर्हेने डोळ्यासमोर पुस्तक धरुन, सगळ्या खिडक्या आणि एकमेव दाराची कडी गच्च लावून मी पहाटे पर्यत त्या अनामिक भितीशी सामना करत राहीले, न भिता :-)

अर्थात त्यात रात्र गेली, त्यामुळे तो सामना मी जिंकला/हरला हे न कळून सुद्धा मी शांतपणे झोपी गेले !

तशी मला खरंच भिती वाटतं नाही पण !!!

Saturday, February 11, 2017

सृष्टीच्या इतिहासाचा मूक साक्षीदार


इतिहास हा जेत्याकडून लिहीला जातो, असं असतांना, आपल्या नात्याचा इतिहास मी
कां लिहीतेय हा प्रश्न तुला पडला असणार, पण इतिहास ह्या आमच्या सारख्या मर्त्य
मानवांसाठी असतो, हे लक्षात घेतल्यावर, आपल्यामध्ये या कामासाठी मीच योग्य
उमेदवार आहे, हे ही तुला पटेलच.

तसं तुला सगळ्याच गोष्टी पटतात. तुला आणि कुटुंबियांना.  पृथ्वीवर आमच्या
कितीतरी आधीपासून तुमचं वास्तव्य आहे. जवळ जवळ ३७० मिलीयन्स वर्षांपासून.
अर्थात आमचं काळाचं हे गणित तुमच्यासाठी तोकडंच. तरीही, आम्हांला आमच्या
परिमाणात सगळं तोलायला, मोजायला आवडतं. दुसरा पर्याय तरी काय आहे म्हणा!
तर तुमचा सगळ्यात वयोवृद्ध कॅलिफोर्नियातल्या व्हाईट मॉउटन्स चा रहिवासी,
पाईन कुळातला, वय वर्षे अवघे ५०६६!  सगळ्यात उंच, रेडवुड जातीचा, तो ही
कॅलिफोर्नियातल्या रेडवुड नॅशनल पार्क मधला, हायपरेऑन, ३७९ फूट उंचीचा! आणि
आकारमानाने सगळ्यात मोठा समजल्या जाणारा, आणि सगळ्यांचा आवडता,
जनरल शेरमन, सेकोया नॅशनल पार्क मध्ये विराजमान आहे, आपल्या विशाल,
१,४८७ मीटर्स क्यूब भूमी व्यापत !

तुझ्याबद्दलच्या अगदी शेकडो  रितीभाती, कहाण्या आमच्यात आहेत.

आऊबंगुयी नावाची एक आफ्रिकन जमात आहे, त्यांच्यामध्ये, मुल जन्माला आलं
की एक झाड लावतात, जर झाड चांगलं वाढत असेल तर ते मुलाची प्रकृती सुद्धा
चांगली, मात्र जर का ते झाड वाळायला लागलं तर त्या मुलाच्या जीवाला धोका
आहे, असं समजतात. त्या झाडाला फुलं आली की त्या मुलाच्या लग्नाची वेळ
आलीये, असं समजतात. त्या झाडाला आपल्या आयुष्यातल्या सुख-दु:खाच्या
प्रसंगी समाविष्ट केल्या जातं. आणि ती व्यक्ती मेल्यानंतर, त्याचा अंतरात्मा त्या
झाडात असे समजतात.

तुझ्या जमिनीत खोलवर जाणारी मुळं आणि आकाशाकडे झेपावणार्या फांद्या,
ह्यामुळे काही संस्कृतीत तुला स्वर्ग आणि पाताळ लोकातला दुवा समजल्या जातं.

भारतीय पुराणांमध्ये सगळ्या इच्छा पूर्ण करणारा, कल्पवृक्ष, बायबल मध्ये
गार्डन ऑफ इडन मध्ये देवाने लावलेला जीवनवृक्ष (tree of life).

मला तुम्ही सगळ्यात चाणाक्ष गुरु वाटता. जंगल्यातल्या तुम्हाला पाहून माझ्या
जिवंतपणाची खूण मला जाणवते, तसंच तुझ्या सारख्या एकट्या/दुकट्या ला
पाहतांना सुद्धा! एखादा ज्ञानी माणूस असावा, तसे वाटता. तुमच्या सळसळण्यार्या
उंच फांद्या आणि अनंतात स्थिरावलेली मुळं, तरीही तुम्ही स्वत:ला तिथेच न हरवू
देता, फक्त एकाच गोष्टीसाठी जगता, स्वत:ला वाढवत! खरंच, ह्या जगात डौलदार
वृक्षासारखे परिपूर्ण सौंदर्य नाही.

जेव्हा एखादं झाडं तोडल्या जातं, त्याला चिर-वेदना देणारी जखम उघडी पडते, त्याच्या
बुंध्याला छेदणार्या वर्तुळांमधून!  त्या वर्तुळांमध्ये काय नसतं? त्याच्या उभ्या आयुष्याचा
इतिहास, आयुष्यभर कानावर पडलेली पथिकांची संभाषणं, रात्र रात्र पडत असलेल्या पावसाने
केलेली सोबत, बाजूने गेलेल्या जंगल्यातल्या वणव्याच्या झळा, त्यानं सोसलेलं दु:ख,
समर्थपणे पेललेल्या वादळाच्या खुणा, शांतपणे सहन केलेल्या वेदनांचे व्रण, किती स्पर्श,
काही प्रेमाचे, काही निर्हेतुक !

तुझ्याकडून मी शिकले, स्वयंभू ह्या शब्दाचा अर्थ !
तू म्हणतोस, "मीच माझी शक्ती. मला माझ्या पूर्वजांबद्दल काही माहिती नाही ना
पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणार्या माझ्या हजारों मुलांबद्दल! माझ्यात असलेल्या
बीजांकुराला मी जपतो, माझ्या अंतापर्यंत, कशाचीही तमा न बाळगता, कशाचीही
पर्वा न करता. माझ्यातल्या मी वरचा माझा विश्वास हेच माझं जगण्याचं बळ."

तुमची आयुष्य आमच्या पेक्षा मोठी, त्यांची शांतताही मोठी. आमच्या पेक्षा शहाणी.
आयुष्यात अडकून पडल्यावर, आयुष्याचं ओझं वाटतं, तेव्हा, तू सांगतोस, "शांत रहा,
स्थिर रहा. आयुष्य सोपे नाही, कठीणही नाही. घर इथेही नाही, घर तिथेही नाही,
घर तुझ्यातच, नाहीतर कुठेच नाही."

म्हणूनच माझे "एक झाड होऊन जगावे" हे उरी जपलेलं स्वप्न आहे.

पण एका संध्याकाळी, आपल्याच बालिश विचारांनी आपली केलेली स्थिती पाहून मी अस्वस्थ
असतांना,  तुमच्यातलं  कुणी सळसळलं.  मी तुमचं सळसळणं ऐकू लागलो आणि माझं "एक
झाड होऊन  राहण्याचे माझ्या मनाशी जपलेलं स्वप्न मात्र हवेतच विरून गेलं" कारण तुमच्या
सळसळण्या मधून "मला स्वत: शिवाय कुणीच व्हायचं नाहीये,  मी हेच माझे घर, हा तो चिरंतन
आनंद" हेच पाझरत गेलं आणि मी घरी आलो.


----------------------------------------------------------------------------------------
ref: Hermann Hesse, "Baume. Betrachtungen und Gedichte"