Saturday, August 17, 2019

शेवटाची सुरुवात

 नेहमीप्रमाणे रात्री झोपण्याच्या आधी पुष्कर डायरी लिहीत होता ….



“आज तिने ब्रंच घेत असतांना मध्येच विचारलं, कशाला भेटायचंय पुढच्या रविवारी? … आणि मी
एकदम दचकलो. हा एवढा टोकाचा प्रश्न तिच्या मला अनपेक्षित होता …”


अनपेक्षित ? पुष्कर त्या शब्दावर अडखळला. खरंच, हे सगळं आपल्याला अनपेक्षित होतं? 


गेले चार महिने तो आणि ती भेटत होते. म्हणजे तसं भेटणं फक्त विकेंडलाच व्हायचं, texting/chatting मात्र
इतर दिवशी पण सुरु असायचं. दोघांची  वय वाढलेली पण त्यामानाने डेटिंग चा अनुभव शून्यात जमा होणारा.
जेव्हा डेटींग चं वय होतं, तेव्हा त्यांना आपापल्या आयुष्यातली नवनवीन आव्हाने, ज्ञानाची क्षितीजे खुणावत होती.
घरच्यांनी जमेल तसे, जमेल तेव्हा म्हणून पाहिलं, पण  “कुणा बरोबर असणे किंवा कुणीतरी सोबत असणे” ह्या
गोष्टीला त्यांच्या कडून हवं तसं प्राधान्य हवं त्या वेळी न दिल्या गेल्यामुळे ते दोघे आता आयुष्याच्या ह्या
अडनिड्या वयात एकमेकांना भेटून सहजीवनाच्या शक्यता पडताळून बघत होते. आणि त्या दो़घांनी
स्वत:ला एक शेवटची संधी द्यायची ठरविली.


तसं कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला असतांना त्याची एका स्कॉलर मुलीबरोबर मैत्री झाली होती. इतर लोकांना
त्यांची मैत्री प्रेमाच्या मैलाचा दगड गाठेल  असं वाटण्या आधीच दोघांची मैत्री ते “धोक्याचं वळण” शिताफीनं
टाळून “शुद्ध मैत्रीच्या” सुरक्षित मार्गाला लागली होती. पुन्हा हे सारं त्याच्या दृष्टीने, सहज, न घडवलेलं.


भारतातल्या कॉलेज शिक्षणात तिला सुवर्णपदक मिळाले होते नंतर परदेशात उच्चशिक्षणाची संधी मिळाली,
ती ही तिला हव्या त्या विद्यापीठात.  त्याचा ही प्रवास तसा थोडाफार तिच्या सारखाच, म्हणजे अगदी सुवर्णपदक
वगैरे नाही आणि त्या मिळाला त्या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्याने ही  पी एच डी पूर्ण केली आणि एका स्टेट
युनिर्वसिटी मध्ये नोकरी करत होता, गेली कित्येक वर्षे. त्याच्या प्रवासामध्ये सुरुवातीचे काही वर्षे “घरच्या जबाबदाऱ्या”
हा एक महत्वाचा घटक होता. दोन्ही बहिणींची लग्न झाल्यानंतर बऱ्यापैकी नाहीसा झालेला. त्याला आठवत होतं, 
त्याच्या लहान बहिणीचे लग्न झाल्यानंतर तो परत येतांनाच्या विमानप्रवासात त्याला प्रचंड रिकामं वाटलं होतं. आणि
फारसा कधी ही न पिणारा असूनसुद्धा त्याला काही न सुचुन त्याने चक्क दोनदा वाईन मागवली होती. आतासुध्दा
त्याला ते आठवुन हसायला आलं. एकदंरीतच, “समोर असेल त्याला सहजपणे सामोरे जाणे” हा त्याच्या आयुष्यातला
स्थायिभाव होता. 


दोघेही तसे दोन-अडिच तासांच्या अंतरावर राहात होते. त्यांचे आई-वडील म्हणे एकमेकांना भारतात असतांना
ओळखत होते. त्या ओळखीमुळेच मग ह्या दोघांना एकमेकांना भेटण्या बद्दल सुचविण्यात आले. एकमेकांचे
नंबर्स एकमेकांना दिल्या गेले. सुरुवातीचे ऑकवर्ड आणि जुजबी मेसेजेस नंतर ते मुद्द्यावर आले.
कधी भेटायचं? कुठे भेटायचं?


त्याला त्यांची पहिली भेट आठवत होती, स्वत: बद्दल फाजील उत्साहाने सांगावं, असा दोघांचाही स्वभाव नव्हता.
आता तर अशा परिस्थीतीत ते भेटत होते की स्वत: बद्दल आवर्जून सांगावं, अशी गरज ही त्यांना भासत नव्हती.
ती हुशार असल्याचं त्याला माहिती होतंच. त्यामुळे तो थोडा बिचकून होता, पण तिच्या शांत, प्रांजळ आणि
कुठल्याही गोष्टीबद्दल अगदी मुळातून विचार करण्याच्या स्वभावामुळे त्यांची संभाषणं, तो काय करतो
ह्याच्याशी निगडीत राहिली होती. तिने तिच्याबद्दल काय सांगितले हे त्याला जेमतमच आठवत होते,
आणि त्याही पेक्षा त्याने तिला नेहमीप्रमाणे काही न सुचुन फारसे काही विचारलेच नव्हते.


त्यांच्या गेल्या चार महिन्यातील भेटीं चे रंग घेऊन तो अगदी सहजपणे त्यांच्या सहजीवनाचे चित्र रंगवित होता,
पण ह्या क्षणाला प्रथमचा त्याला त्या ते चित्र पुसुन टाकणारा हा विसंवादाच्या रंगाचे अस्तित्व जाणवले.
आणि तो वेड्यासारखा सगळ्या भेटींच्या आठवणी भराभरा उपसुन काढू लागला, ते रंग शोधू लागला ...


त्याला आठवलं, दुसऱ्या भेटीत, तिने त्याला विचारलं होता एक अगदी निरुपद्रवी, आणि कितीतरी ठिकाणी
अगदी सहज विचारल्या जाणारा प्रश्न, “ हाताशी हवा तेव्हढा वेळ आणि पैसा असेल तर तू काय करशील”
आणि पुन्हा वेड्यासारखं काही न सुचुन तो उदगारला होते “प्रवास करीन”. पहिल्या भेटीत “कुठे कुठे फिरला आहेस?”
याचे उत्तर “फारसे कुठे नाही” असे त्याने दिले होते. त्याच्या “प्रवास करीन” ह्या उत्तरावर त्याच्यातली हि विसंगती 
तिने न बोलता त्याच्या कडे फक्त क्षणभर रोखून बघत दाखवून दिली होती.


नंतरच्या  कुठल्यातरी भेटीमध्ये “जेवायला कुठे?” हा यक्षप्रश्न उभा राहिला होता, तेव्हा त्याने “तुला हवं तिथे जाऊ”
असं म्हटल्यावर त्याला तिच्या चेहऱ्यावर क्षणभर कां होईना स्मित झळकेल, असं त्याला वाटलं होतं पण तिचा
चेहरा मात्र त्याच्या उत्तराने आणखीनच प्रश्नांकीत झाला होता.


आणखी एका भेटीत ती ठरविले, की एक छोटीशी ट्रेल करुया, त्याने अर्थातच स्वभावानुसार काही न सुचुन
होकार दिला. एका ठिकाणी चढून जात असतांना त्याने तिला चढून जात असतांना हात पुढे केला, तिने
हो न धरता, फक्त त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा त्याला तिच्या चेहऱ्यावर दिसले ते एक प्रश्नचिन्ह !!


तसे ते नेहमीच विकेंड ला भेटायचे, पण कधीतरी तो कामानिमित्त तिच्या भागाजवळ पोहचला होता. मेसेज
करुन बराच वेळ वाट पाहून त्याने शेवटी फोन लावला तर तोही एगेंज्ड. थोड्या नाराजीनेच तो तिथून निघाला.
त्याच्या त्या मेसेज ला उत्तर नाही, आणि भेटल्यानंतर जेमतेम सॉरी ह्या पलिकडे तिच्याकडून काही आलं नाही.


एकदा पुढच्या भेटीत काहीतरी ऑउटडोअर activity करुया म्हणून तिने मेसेज केलेला. त्याला कामामुळे,
किंवा इतर काही कारणांमुळे त्याने उत्तर दिले गेले नव्हते आणि तिने ही पुन्हा त्याबद्दल त्याला टोकून त्या
बद्दल विचारलं नव्हतं. त्याला तेव्हा वाटलं तिला त्याचे फारसे काही वाटले नाही म्हणून, पण तेव्हा त्याच्या
मनाने दुर्लक्षलेली तिची निराशा त्याला आज लख्खपणे दिसली.  


एका भेटीनंतर पोहोचल्या वर नक्की मेसेज कर, असे त्याने तिला आवर्जून सांगितले होते, ती ते सोयिस्कर
पणे विसरली होती आणि त्याने ही सहजपणे ना स्वत:हून तो प्रश्न विचारला होता ना तिला त्याबद्दल विचारले होते.


हे आणि असे अनेक विसंवादाचे क्षण त्याच्या मनात निराशेची ची सावली पसरु लागले.


म्हणजे ह्या नात्याच्या शेवटाची सुरुवात तर कितीतरी आधीच झाली नव्हती कां? अगदी नक्की केव्हापासून
असं सांगणं तर शक्य नाही. कारण ती कितीतरी अश्या क्षणांमध्ये विखुरली होती. त्याच्या डोळ्यासमोर
त्यांच्या सहजीवनाच्या चित्राचे तुकडे पसरले होते, आणि नेहमी प्रमाणे त्याने काही न सुचुन ते बाजूला सारले.
हे असे कां घडले हा प्रश्न त्याने आतापर्यंत कधीव स्वत:ला विचारला नव्हता, तो यावेळेही त्याच्या मनात
आला नाही. आणि तो टिव्ही चालू करुन निर्बुध्दपणे समोर दिसत असलेला कुठलातरी गेम बघत बसला. 

लमाल ऑगस्ट २०१९ "सुरुवात"