इतिहास हा जेत्याकडून लिहीला जातो, असं असतांना, आपल्या नात्याचा इतिहास मी
कां लिहीतेय हा प्रश्न तुला पडला असणार, पण इतिहास ह्या आमच्या सारख्या मर्त्य
मानवांसाठी असतो, हे लक्षात घेतल्यावर, आपल्यामध्ये या कामासाठी मीच योग्य
उमेदवार आहे, हे ही तुला पटेलच.
तसं तुला सगळ्याच गोष्टी पटतात. तुला आणि कुटुंबियांना. पृथ्वीवर आमच्या
कितीतरी आधीपासून तुमचं वास्तव्य आहे. जवळ जवळ ३७० मिलीयन्स वर्षांपासून.
अर्थात आमचं काळाचं हे गणित तुमच्यासाठी तोकडंच. तरीही, आम्हांला आमच्या
परिमाणात सगळं तोलायला, मोजायला आवडतं. दुसरा पर्याय तरी काय आहे म्हणा!
तर तुमचा सगळ्यात वयोवृद्ध कॅलिफोर्नियातल्या व्हाईट मॉउटन्स चा रहिवासी,
पाईन कुळातला, वय वर्षे अवघे ५०६६! सगळ्यात उंच, रेडवुड जातीचा, तो ही
कॅलिफोर्नियातल्या रेडवुड नॅशनल पार्क मधला, हायपरेऑन, ३७९ फूट उंचीचा! आणि
आकारमानाने सगळ्यात मोठा समजल्या जाणारा, आणि सगळ्यांचा आवडता,
जनरल शेरमन, सेकोया नॅशनल पार्क मध्ये विराजमान आहे, आपल्या विशाल,
१,४८७ मीटर्स क्यूब भूमी व्यापत !
तुझ्याबद्दलच्या अगदी शेकडो रितीभाती, कहाण्या आमच्यात आहेत.
आऊबंगुयी नावाची एक आफ्रिकन जमात आहे, त्यांच्यामध्ये, मुल जन्माला आलं
की एक झाड लावतात, जर झाड चांगलं वाढत असेल तर ते मुलाची प्रकृती सुद्धा
चांगली, मात्र जर का ते झाड वाळायला लागलं तर त्या मुलाच्या जीवाला धोका
आहे, असं समजतात. त्या झाडाला फुलं आली की त्या मुलाच्या लग्नाची वेळ
आलीये, असं समजतात. त्या झाडाला आपल्या आयुष्यातल्या सुख-दु:खाच्या
प्रसंगी समाविष्ट केल्या जातं. आणि ती व्यक्ती मेल्यानंतर, त्याचा अंतरात्मा त्या
झाडात असे समजतात.
तुझ्या जमिनीत खोलवर जाणारी मुळं आणि आकाशाकडे झेपावणार्या फांद्या,
ह्यामुळे काही संस्कृतीत तुला स्वर्ग आणि पाताळ लोकातला दुवा समजल्या जातं.
भारतीय पुराणांमध्ये सगळ्या इच्छा पूर्ण करणारा, कल्पवृक्ष, बायबल मध्ये
गार्डन ऑफ इडन मध्ये देवाने लावलेला जीवनवृक्ष (tree of life).
मला तुम्ही सगळ्यात चाणाक्ष गुरु वाटता. जंगल्यातल्या तुम्हाला पाहून माझ्या
जिवंतपणाची खूण मला जाणवते, तसंच तुझ्या सारख्या एकट्या/दुकट्या ला
पाहतांना सुद्धा! एखादा ज्ञानी माणूस असावा, तसे वाटता. तुमच्या सळसळण्यार्या
उंच फांद्या आणि अनंतात स्थिरावलेली मुळं, तरीही तुम्ही स्वत:ला तिथेच न हरवू
देता, फक्त एकाच गोष्टीसाठी जगता, स्वत:ला वाढवत! खरंच, ह्या जगात डौलदार
वृक्षासारखे परिपूर्ण सौंदर्य नाही.
जेव्हा एखादं झाडं तोडल्या जातं, त्याला चिर-वेदना देणारी जखम उघडी पडते, त्याच्या
बुंध्याला छेदणार्या वर्तुळांमधून! त्या वर्तुळांमध्ये काय नसतं? त्याच्या उभ्या आयुष्याचा
इतिहास, आयुष्यभर कानावर पडलेली पथिकांची संभाषणं, रात्र रात्र पडत असलेल्या पावसाने
केलेली सोबत, बाजूने गेलेल्या जंगल्यातल्या वणव्याच्या झळा, त्यानं सोसलेलं दु:ख,
समर्थपणे पेललेल्या वादळाच्या खुणा, शांतपणे सहन केलेल्या वेदनांचे व्रण, किती स्पर्श,
काही प्रेमाचे, काही निर्हेतुक !
तुझ्याकडून मी शिकले, स्वयंभू ह्या शब्दाचा अर्थ !
तू म्हणतोस, "मीच माझी शक्ती. मला माझ्या पूर्वजांबद्दल काही माहिती नाही ना
पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणार्या माझ्या हजारों मुलांबद्दल! माझ्यात असलेल्या
बीजांकुराला मी जपतो, माझ्या अंतापर्यंत, कशाचीही तमा न बाळगता, कशाचीही
पर्वा न करता. माझ्यातल्या मी वरचा माझा विश्वास हेच माझं जगण्याचं बळ."
तुमची आयुष्य आमच्या पेक्षा मोठी, त्यांची शांतताही मोठी. आमच्या पेक्षा शहाणी.
आयुष्यात अडकून पडल्यावर, आयुष्याचं ओझं वाटतं, तेव्हा, तू सांगतोस, "शांत रहा,
स्थिर रहा. आयुष्य सोपे नाही, कठीणही नाही. घर इथेही नाही, घर तिथेही नाही,
घर तुझ्यातच, नाहीतर कुठेच नाही."
म्हणूनच माझे "एक झाड होऊन जगावे" हे उरी जपलेलं स्वप्न आहे.
पण एका संध्याकाळी, आपल्याच बालिश विचारांनी आपली केलेली स्थिती पाहून मी अस्वस्थ
असतांना, तुमच्यातलं कुणी सळसळलं. मी तुमचं सळसळणं ऐकू लागलो आणि माझं "एक
झाड होऊन राहण्याचे माझ्या मनाशी जपलेलं स्वप्न मात्र हवेतच विरून गेलं" कारण तुमच्या
सळसळण्या मधून "मला स्वत: शिवाय कुणीच व्हायचं नाहीये, मी हेच माझे घर, हा तो चिरंतन
आनंद" हेच पाझरत गेलं आणि मी घरी आलो.
----------------------------------------------------------------------------------------
ref: Hermann Hesse, "Baume. Betrachtungen und Gedichte"