गोष्ट जवळपास २०० वर्षांपूर्वींची. १७३० सालची. राजस्थानमधली.
जोधपुरच्या नवनिर्वाचित राजा अभयसिंगांना नविन राजमहाल बांधायचा होता. त्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची जुळवाजुळव करण्यात राजाचे मंत्रीगण लागले. सर्वप्रथम बांधकामासाठी लागणाऱ्या चुना भट्टीसाठी इंधनाचा शोध सुरु झाला. राजाने आपला मंत्री “गिरधारी दास भंडारी” यावर ती जबाबदारी सोपवली. गिरधारी दास भंडारीची दृष्टी सर्वप्रथम पडलं ती तिथून २५ किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या “खेजडली” गावावरती. त्याने लगेच राजाला बातमी दिली, “इथून जवळच खेजडली नावाचे गाव आहे, त्या गावात खेजडीची (म्हणजे मराठीत शमी) बरीच झाडे आहेत, ती आपल्याला इंधन म्हणून वापरता येतील". राजाने पण त्याच्या ह्या प्रस्तावाला लगेच संमती दिली.
राजाचे शिपाई लगेच खेजडली गावाकडे निघाले. तिथे पोचताच, एका घराच्या परिसरात त्यांना खेजडीची अनेक झाडं दिसली, त्यांनी तिकडे मोर्चा वळवला. ते घर होतं, अमृतादेवींचं! अमृतादेवींने त्यांना तिथेच रोकलं. “ही खेजडीची झाडं आमच्या घरचे सदस्य आहेत, मी राखी बांधली आहे ह्यांना. मी तुम्हांला ही झाडं तोडू देणार नाही.” यावर राजाच्या शिपायांनी तिला विचारलं, “अस्सं, मग ह्या तुझ्या घरच्या सदस्यांच्या रक्षणासाठी तू काय करणार आहे?” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता अमृतादेवी म्हणाली, “सिर सांचे रूंख रहे तो भी सस्ता जाण” ! अर्थात माझे शीर अर्पून जर ही झाडे जिवंत राहणार असली तर तो सौदा फायद्याचाच आहे. आता तिच्या बरोबरीने, सगळे गावकरी पण झाडांच्या रक्षणासाठी उभे ठाकले.
अमृतादेवी आणि गावकरी बिश्नोई समाजाचे होते. बिश्नोई भारतातील एक हिंदू संप्रदाय आहे. ह्या संप्रदायाचे अनुयायी राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश ह्या भागात राहतात. श्री गुरु जभ्भेश्वर ह्यांना बिश्नोई समाजाचे संस्थापक मानल्या जातं. बिश्नोई हा शब्द “वीस” आणि “नऊ” ह्या शब्दापासून तयार झाला आहे. म्हणजेच जे २९ नियमांचे पालन करतात ते “बिश्नोई”. ह्या २९ नियमात, “खोटे बोलू नये, चोरी कधी करु नये” अशा सर्वांना माहिती असलेल्या नियमांबरोबरच “ हिरवे झाड तोडू नये” हाही एक नियम आहे.
तर त्यादिवशी ते राजाचे शिपाई नरमून परत गेले. पण ह्या घटनेची वार्ता मात्र पंचक्रोशीत लगोलग पसरली.
काही दिवसांतच (२१ सप्टेंबर १७३०) राजाचे मंत्री गिरधारी दास भंडारी पुन्हा त्या गावात परतले, ते बरोबर सैनिकांचा ताफा घेऊन आणि सूर्योदयाच्या आधीच. सारं खेजडली गाव अजून झोपेतच होतं. सैनिकांनी गिरधारी दास भंडारी च्या आदेश दिल्याबरोबर, कामाला सुरुवात केली ती अमृतादेवीच्या घराच्या परिसरातील हिरवीगार खेजडीची झाडे कापून. त्यांचे ते आवाज ऐकून, अमृतादेवी आपल्या तिन्ही मुलींबरोबर बाहेेर आली. आणि तिने हे कृत्य तिच्या धर्माच्या विरोधात जाणारे आहे, हे सांगून त्या सैनिकांना अडवायचा प्रयत्न करु लागली. तेव्हा गिरधारी दास भंडारी उद्दामपणे तिला म्हणाला, “ठीक आहे, ही झाड आम्ही न कापण्यासाठी तु आम्हांला किती पैसे देशील?” अमृतादेवीने त्याला त्वेषाने नकार देऊन हा माझ्या धर्माचा अपमान आहे, म्हणून एका झाडाला तिने घट्ट मिठी मारली आणि जल्लोष केला, “सिर सांचे रूंख रहे तो भी सस्ता जाण”. क्षणार्धात तिचे मस्तक धडावेगळे केले गेले. तीच गत तिच्या तीन मुलींच्या मस्तकांची झाली.
ही बातमी एखाद्या वणव्यासारखी चोहीकडे पसरली. आजूबाजूच्या ऐंशी-एक गावांमधून लोक तिथे जमा झाले. सगळ्यांनी एक मताने निर्णय घेतला, प्रत्येक झाडासाठी एक गावकरी आपल्या प्राणांची आहुती देईल. सुरुवात वृध्दांपासून केली.
त्यावर तो पाषाणह्रदयी मंत्री उद्गारला, “ ही म्हातारी माणसं तशीही कोणाला नकोच आहेत, मग ती मेल्याचं काय मोठं लागून गेलं?” आणि त्याने सैनिकांना त्यांचे काम सुरु ठेवण्याचा हूकूम दिला. त्याचे ते निर्मम उद्गार ऐकून सगळे गावकरी बिथरले आणि आपल्या प्राणांची आहुती देण्याची तिथे जणू चढाओढच लागली. मोठे, लहान, वृध्द, स्त्रिया सगळे सरसावून झाडांना घट्ट बिलगून उभे राहीले. आणि त्यांची मस्तकं बिलगलेल्या झाडांबरोबर जमिनदोस्त होत होती. हे कांड मात्र फार काळ सुरु राहू शकलं नाही. गिरधारी दास भंडारी ला वृक्षतोड थांबवावीच लागली. जेव्हा हे हत्याकांड संपले, तोपर्यंत एकूण ३६३ बिश्नोई समाजाचे गावकरी धारातिर्थी पडले होते. यांत ७१ स्त्रिया आणि २९२ पुरुषांनी आपल्या गावच्या खेजडी झाडांसाठी बलिदान केले होते. खेजडली गावाची जमीन तिच्याच अंगाखांद्यावर खेळणाऱ्या गावकऱ्यांच्या रक्ताने न्हाऊन निघाली होती.
ह्या घटना राजापर्यंत पोहचली. त्याचे मन विषण्ण झाले. झालेल्या अपराधाचे प्रायच्छित म्हणून त्याने ह्या बिश्नोई समाजाच्या ह्या गावकाऱ्यांच्या सन्मानार्थ ताम्रपत्र प्रसिद्ध केले आणि मारवाड भागात यानंतर खेजडी चे झाड कधीही तोडले जाणार नाही असे फर्मान काढले. आजही ह्या भागात खेजडी झाडाला तोडत नाही.
खेजडली गावात दर वर्षी ह्या दिवशी ह्या झाडे वाचवण्याऱ्या शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक जत्रा भरते. इथे बिश्नोई समाजाने शहीद स्मारक बनविले आहे. दूरदूरुन पर्यावरणप्रेमी ह्यात सामील होतात.
दुसरी गोष्ट मात्र तशी इतक्यातलीच. जवळपास पन्नास वर्षांपूर्वींची.
१९७४ साली उत्तराखंड वन विभागाने रैणी नावाच्या गावाजवळच्या जवळपास ६८० हेक्टर जंगल हृषिकेश च्या
ठेकेदाराला विकले. आणि ह्या विक्रीच्या अंतर्गत तिथल्या २४५९ वृक्षतोडीचा आदेश दिला गेला. लगेचच रैणी गावात ह्या वृक्षतोडी च्या विरोधात गोपेश्वर नावाच्या गावात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले. ज्याचे नेतृत्व गौरा देवी ह्या महिलेने केले.
ठेकेदाराला विकले. आणि ह्या विक्रीच्या अंतर्गत तिथल्या २४५९ वृक्षतोडीचा आदेश दिला गेला. लगेचच रैणी गावात ह्या वृक्षतोडी च्या विरोधात गोपेश्वर नावाच्या गावात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले. ज्याचे नेतृत्व गौरा देवी ह्या महिलेने केले.
त्याचवेळी रस्त्याच्या कामामुळे झालेल्या नुकसानाचा मोबदला घेण्यासाठी रैणी गावकऱ्यांना चमोली ह्या जिल्हाच्या ठिकाणी बोलावले गेले होते. वन विभागाने ह्या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले. तो मोबदला घेण्यासाठी जेव्हा सगळे पुरुष चमोलीला गेले, आणि त्याचवेळी वाटाघाटीसाठी सामाजिक कार्यकत्यांना गोपेश्वरला बोलावल्या गेले. आणि ठेकेदाराच्या मजूरांना सांगण्यात आले की ते आता रैणी गावात जाऊ शकतात आणि बिनधोक वृक्षतोड करु शकतात. ते मजूर रैणी गावाकडे जात असतांना एका मुलीला दिसले आणि तिने ताबडतोब गौरा देवीला हे कळविले. गौरा देवीने गावातल्या २०/२१ स्त्रियांना अणि लहान मुलांना गोळा केले आणि जंगलाकडे धाव घेतली. आणि त्यांनी झाडांना मिठी घातली आणि ती तोडण्यास प्रतिकार केला. “हे जंगल म्हणजे आमचं माहेर आहे, ह्याला आम्ही हानी पोचवू देणार नाही”. आलेल्या मजूरांना ह्या प्रकारच्या विरोधाची कल्पना नव्हती आणि ते गोंधळले. तो पर्यत झाडांना मिठी मारुन त्यांच्या तोडीला विरोध करणाऱ्यांची संख्याही वाढत होती. शेवटी त्यांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.
हळूहळू ह्या आंदोलनाची बातमी इतर भागात पोहोचली आणि एका दशकाच्या आत संपूर्ण उत्तराखंडामध्ये हे आंदोलन पसरले. आर्थिक फायद्यासाठी होणारी जंगलतोड वाचविण्यासाठी शेकडो लोक पुढे आले. ह्या स्त्रियांची संख्या उल्लेखनीय होती. पुढे जाऊन ह्या आंदोलनाचे नेतृत्व प्रसिद्ध नेते सुंदरलाल बहुगुणा ह्यांनी केले.
ह्या आंदोलनाची उपल्बधी म्हणजे, तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षासाठी हिमालयीन जंगलामध्ये वृक्षतोडी वर बंदी टाकली. १९८७ साली ह्या आंदोलनाला “ सम्यक जिविका पुस्काराने (Right Livelihood award) सन्मानित केले.
ह्या आंदोलना आदी जंगलांकडे केवळ व्यापारी दृष्टीकोनातून बघितले जात होते. ह्या आंदोलनामुळे सामान्य लोकांनी त्या जंगलांचं पर्यावरणीय महत्व जगासमोर आणलं.
हे आंदोलक झाडांना कापण्यापासून वाचविण्यासाठी “चिपकाके खडी हो जाते थे”, म्हणून हे आंदोलन हे “चिपको” आंदोलन. चिपको आंदोलनाचे घोषवाक्य आहे:
क्या हैं जंगल के उपकार, मिट्टी, पानी और बयार।
मिट्टी, पानी और बयार, जिन्दा रहने के आधार।
(बयार - हवा )