Saturday, October 13, 2018

चोरी

परवा कुणीतरी तावातावाने सांगत होतं,
माझ्याघरी चोरी झालीये, सगळं सगळं चोरीला गेलंय!
माझं सगळं घर साफ केलंय,
माझं असं काहीच उरलं नाही,
सगळं संपलं !


त्याच्या कानावर हे शब्द पडले,
त्याला मनापासून हसायला आलं !
त्याच्या आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा
त्याच्या डोळ्यासमोरुन झरझर सरकून गेला आणि
तो एका सुजाण, जाणकार प्रेक्षकासारखा
त्यातली मर्मस्थळे न्याहाळू लागला !


नकळत्या वयात घरच्या वाईट परिस्थीतीची
जाणीव त्याला करुन देण्यात आली आणि
त्याची अनमोल किंमत कळायच्या आत
त्याचा निरागसपणा चोरीला गेला !


वयाशी प्रामाणिक राहून त्याची स्वप्नं फुलली,
घरट्या बाहेर पडून उंच भरारी घ्यायला आसुसली!
पण शिक्षण संपता संपता वास्तवतेची झळ
त्याला लागली, व्यवहाराची गणित सोडवतांना
त्याच्या स्वप्नांची मात्र चोरी झाली !  


यानंतरच्या चोरीने मात्र त्या आयुष्यात वसंत बहरला
आणि एक सुगंधी ऋतु त्याच्या आयुष्यात फुलला!
जे विकत घेता येत नाही, पण क्षणात चोरता येतं,
कुणा एकासाठी जे कवडीमोल आहे,
पण त्या दोघांसाठी मात्र अनमोल असतं, अशा प्रेमासाठी,
त्याचं अगदी त्याच्या देखत हृदय चोरीला गेलं!


लग्न, संसार सुरु झाला,
जबाबदार्या घरच्या, बाहेरच्या आणि दारच्या !
मुलंबाळं, त्यांच्या शाळा, त्याची नोकरी,
पैशाला वाटा हजार, आणि त्या बुजवता बुजवता
रहाटगाडग्याला बांधला गेला तो दिवस आणि रात्री !
त्याला कळले सुद्धा नाही केव्हा त्याचा वेळ चोरीला गेला!


धकाधकीची वर्षे उडून गेली, पण
आयुष्याची पद्धत मात्र नाही बदलली
सतत कशातरी मागे धावायची,
सवय तशीच राहीली !
सगळं जागच्या जागी असून काहीतरी खुपतंय,
जाच्यासाठी धावतोय ते मिळून सुद्धा उर धपापतोय!
जी पेटी त्याच्या मनाच्या कोपर्यात होती पडून,
ज्यात ठेवली होती त्याने शांतता जपून
जरा गडबड संपली की तेव्हा लागेल म्हणून.
आता लक्षात येतंय, पण काय करावं ते सुचत नाही
जी त्याची हक्काची गोष्ट समजत होतो तो,
तीच त्याला आता सापडत नाही, कारण
त्याच्या शांततेची किल्ली चोरीला गेलीये !

Saturday, August 18, 2018

मनाचं घर



मनातल्या प्रत्येक विचाराला तर्क, बुद्धी, भावना  आणि वास्तवाच्या निकषावर तासून मगच त्याला आपल्या मनात त्याला प्रवेश द्यायचा असा त्याला कळायला लागलं तेव्हापासूनचा शिरस्ता होता.


तरिही दर काही दिवसांनी, विचारांची सरमिसळ होत असे. एखादी कृती केल्यावर आपण नक्की कोणत्या विचाराने ती केली ह्या बद्दल त्यांच्या मनात संभ्रम उडत असे. त्यामुळे हे विचारांचे वर्गीकरण आणि मनाची स्वच्छता हा त्याच्या दैनंदिनीचाच भाग बनला होता. त्याला ज्ञात असलेल्या रकान्यामध्ये सगळ्या विचारांचे वर्गीकरण केले की त्याला फार सुरक्षित वाटत असे. आपण समाजाचे एक आदर्श प्रतिनीधी आहोत याचा त्याला विश्वास वाटत असे. आपल्या मनामध्ये बुद्धी, तर्क, भावना आणि वास्तव ह्या गोष्टींशिवाय इतर काहीही असूच शकणार नाही  ह्याची त्याला खात्री होती आणि त्याचा सार्थ अभिमान होता. त्या अभिमानातच त्याने त्याचे आजवरचे आयुष्य व्यतीत केले होते. त्या दिवसांपर्यत …

कंगव्याने केस विंचरावेत, तसा तो आपल्या बुद्धी तर्काने मनातल्या विचारांचा गुंता सोडवत होता.

त्याचा भूतकाळ, बायको, मुलंबाळं, आई-वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, त्याचा व्यवसाय, लपवून ठेवलेले अपमानाचे क्षण किंवा आता धरणी पोटात घेईल तर अशा हातघाईचे क्षण … ह्या आणि अशा रकान्यामध्ये तो समोर दिसत असलेले विचार टाकत होता. सवयीप्रमाणे त्याचे सुरु होते, मन स्वच्छ होत असल्याची जाणीव त्या एक सुरक्षित समाधान देत होती.

एकदा सगळीकडे नजर फिरवित त्याने कुठे विचार राहिले तर नाहीना, अशी खात्री करुन घेतली. आणि त्याच्या अधू झालेल्या दृष्टीला आज मनाच्या एका कोपर्यात काही जीर्ण विचारांची जळमटे दिसली. ती दूर करायला तो तिथे लगबगीने धावला आणि अडखळून पडला. त्याचा जमिनीला स्पर्श झाला आणि तो दचकला, त्याचा पाय त्याला त्याच्या अगदी लहानपणी, तो ५/६ वर्षांचा असतांना त्याला एक कल्पना सुचली होती, तिला लागला होता. जिंवत होती ती अजूनही. त्याच्या अंगावर सरसरून शहारा आला. त्याने जमिनीवर बसल्या बसल्याच हात फिरविले आजूबाजूला आणि त्याने जोेरदार किंकाळी फोडली. त्याच्या मनाची जमिन ही त्याला आयुष्यभर त्याला सुचलेल्या कल्पनांची बनलेली होती.

त्याला आयुष्यात पहिल्यांदाच एकाच वेळी जिंवत आणि इतके हताश वाटले. त्याचे इतक्या वर्षांचे प्रयत्न फोल ठरले होते.

आयुष्यभर पायदळी तुडवून तुडवून त्यांच्या अस्तिवाचा गळा घोटत होता तो, पण त्या कल्पना म्हणजेच त्याचं अस्तित्व हे सत्य लख्खपणे त्याच्या पुढ्यात उभं ठाकलं. पण उशीर झाला होता.

Saturday, June 9, 2018

ती स्पर्शाची

 लहानपणी आईच्या पोटाला हात लावून झोपायची सवय होती तिला. नंतर काही वर्षे कुणाच्यातरी कानाच्या पाळीला हातानी गोंजारत, अगदी कुणी नसेल तर घरातल्या मांजरीचा कान सुद्धा तिला चाले. कुठेही बाहेर फिरायला गेले की दिसेल त्या गोष्टीला हात लावू नाकोस, अशी तंबी मिळायची तिला. बागेत, जंगलातून फिरतांना दिसेल त्या झाडाच्या खोडाला हात लावून बघितल्याशिवाय तिचा पाय पुढे सरकायचा नाही.



शाळेत गेल्यावर, रिझल्टच्या दिवशी निक्काल काय लागला, हे वर्गशिक्षकांकडून ऐकतांना, उत्कंठा शिगेला पोचली असायची तेव्हा तिने आपल्या बाजूच्या मैत्रिणीचा हात गच्च धरुन ठेवला असायचा.


*********


नोकरीनिमीत्ताने ती रोज लोकलचा प्रवास करायची, पण घर ते ऑफिस ह्या दोन स्टेशनांव्यतिरिक्त ती फारशी फिरली नव्हती.  ह्या स्टेशनवर येण्याची आणि तिथून लोकल पकडण्याची ही तिची पहिलीच वेळ.


अंधार पडायला लागलेला, ही लोकल सोडून चालणार नव्हतं. त्यातही गाडीने अगदी वेळेवर प्लॅटफॉर्म बदलल्याने ती आणि गाडी जवळजवळ एकाच वेळेला प्लॅटफॉर्म वर शिरत होत्या. समोर जो दिसेल त्या जनरल डब्यामध्येच तिला घुसावं लागलं. संध्याकाळची ऐन गर्दीची वेळ, गाडीत मुंगी शिरायला पण जागा नाही अशी परिस्थिती. ती लोकल मध्ये कशीबशी चढली, प्रवाहाने तिला ढकलत ढकलत दुसऱ्या बाजूच्या दरवाज्याकडे नेलेत. माणसांच्या गर्दीतून वाट काढत बाहेरचा वारा तिला खुणावत होता, मग तिने आत जाऊन जागा वगैरे शोधायचा विचारच काढून टाकला, तसाही प्रश्र्न २/३ स्टेशनांचाच होता.


ती आता अगदी दरवाज्यापर्यंत पोहोचली होती, डब्यातल्या गर्दीकडे पाठ करुन बाहेर पाहू लागली. अंधार पडू लागला होता, डब्यात अगदी मिणमिणते दिवे होते, बाहेरचा अंधार त्या प्रकाशाला व्यापून टाकत होता. तिचं नसलेलं स्टेशन आलं, पुन्हा एक गर्दीचा लोंढा आत शिरला, आणि सगळीकडून बसणारे धक्के खात, आता आपल्याला धरणी पोटात घेईल तर बरं, असा विचार करत ते नकोसे स्पर्श सहन करीत राहीली, नजर बाहेर, पाठ गर्दीकडे ! तितक्यात त्या काही सहेतुक, निर्हेतुक आणि ओझरत्या स्पर्शांमध्ये, एक स्पर्श सातत्याने जाणवायला लागला. तिला तिच्या कंबरेवर मागून अगदी घट्ट पकड जाणवत होती. तिला मागे बघणं शक्यच नव्हतं, प्रश्र्न अगदी काही मिनीटांचा होता, तेवढ्यासाठी तमाशा करणे तोही इतक्या कोलाहालात, ती तो स्पर्श सहन करु लागली, बहुतेक तो तिच्या अगदी मागेच असावा. जसे स्टेशन जवळ आले तसा गर्दीचा रेटा वाढू लागला, तिला आता दोन्ही हात तिच्या कमरेवर जाणवले, गच्च आवळून धरलेले, तिने श्वास रोखून ठेवला होता, इतक्यात स्टेशन आले, तिने अक्षरश: प्लॅटफॉर्म वर उडीच मारली, आणि गर्दीबरोबर धावत सुटली. कमरेवरचा त्या स्पर्शाचा विळखा तिला अजून जाणवत होता.


*********************


ती चहाचे रिकामे कप घेऊन घरात आली. तिचे मंद स्मित पाहून तिच्या लहान बहिणीला आपल्या ताईला बाहेर बसलेला आणि तिला बघायला आलेला मुलगा आवडला आहे तिने काही न सांगताच कळलं. थोड्या वेळानी ती मंडळी निघाली. आई-बाबा पण खुषीत होते, मुलाला पण ती आवडली असे वाटत होते. मुलगा इथलाच, मुंबईचा. पुढचे दोन-चार दिवस अगदी आतुरतेने त्यांच्याकडून काय निरोप येतोय ह्याची वाट पाहण्यात गेले. शेवटी एकदाचा आला फोन त्यांच्या कडून, होकाराचा! सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दुसऱ्याच दिवशी त्याचा ऑफिसमध्ये फोन आला, पहिल्या जुजबी आणि जराशा अवघडलेल्या वाक्यांनंतर त्याचा प्रश्र्न, “कधी भेटायचं?”, ती जरा गडबडली. “घरच्यांना विचारुन सांगते” ह्या तिच्या उत्तरावर तो जराशा नाराजीने थांबला. तिचे आई-वडील लवकरच त्याच्या आई-वडिलांना भेटले, आणि दोन आठवड्यानंतरची तारिख, साखरपुड्यासाठी पक्की करण्यात आली. मग जेव्हा पुन्हा त्याने “केव्हा भेटायचे”  हे विचारले, तिने साखरपुड्यानंतर असे गुळमुळीत उत्तर दिले. ठरल्या प्रमाणे साखरपुडा पार पडला, आणि त्यांच्या भेटी सुरु झाल्या. सुरुवातीला त्याच्या सहवासात थोडीशी बुजलेली ती, हळूहळू मोकळी होऊ लागली. अशातच एका संध्याकाळी, समुद्रकिनारी ते दोघे बऱ्याच उशिरा पर्यंत होते, आजूबाजूची गर्दी कमी झाली होती, ती चालतांना समुद्राकडे बघत होती आणि तो तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि तिच्या कंबरेवर हात ठेवले दोन्ही. एक दोन मिनीट तशीच गेली असतील.


दुसऱ्या दिवशी सकाळी आईने तिला विचारलं, “का गं काल रात्री उशिर झाला यायला, जावईबापू काय म्हणतात? “  तिने संथपणे आईला सांगितलं, “आई, मला हे लग्न करायचं नाही. प्लिज मला कारण विचारु नकोस”.


***********************

स्पर्शाला स्वत:ची स्मृती असते, ती कितीही मनात आणलं तरी नष्ट करता येत नाही.

लमाल जून २०१८ "स्पर्श"

Saturday, April 14, 2018

ती आणि गुपितं

 लहानपणापासून तिला गुपितांची मोठी हौस. कुणीही “हे आपलं शिक्रेट आहे बरं कां” असं म्हटलं की तिचे निरागस डोळे “आपल्याजवळ  सगळ्या जगात कुणाचकडे नसलेली सगळ्यात भारी गोष्ट आहे “ असे लकाकायचे. मग ती अगदी “गुपित” मय होऊन जायची, इकडे तिकडे बागडतांना, शाळेत, मित्र-मैत्रिणींबरोबर, घरी दारी भावंडाशी खेळतांना सुद्धा आपलं गुपित जाणवलं की तिला खुदकन हसायची.

बहीणी भावंडाबरोबरची गुपितं असायची, “आज संध्याकाळी शेजारचे काका आपल्याला आईसक्रीम खायला नेणार आहे”, किंवा “उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे मामामामी पण येणार आहे” आणि मैत्रिणीं बरोबरची, “आज मी डब्ब्यात शिरा आणलाय”, किंवा आपल्या बाई काल आमच्या वरच्या काकूंकडे आल्या होत्या.


ह्या गुपितांचे तसे वय तरी किती असणार, काही तासांचे अथवा, काही दिवसांचे! दुसर्या व्यक्तीला भेटल्यावर ही आपली तिच्या डोळ्यात त्यांच्या गुपिताच्या खाणाखुणा शोधू लागे पण त्या व्यक्तीच्या डोळ्यातली त्या गुपिताबद्दलची अनोळख पाहून तिला एकदम रिकामं रिकामं वाटे. कधी कधी तिच्या जपलेल्या गुपिताबद्दल तिला तिसरंच कुणीतरी सांगे, मग आपल्या जवळची, जिव्हाळ्याची गोष्ट दूर गेलीये, आपल्याला सोडून गेलीये अशा विचारांनी ती बावरुन जाई. आणि काही तिची गुपितं तशीचं विरुन जातं. पण ती आणि तिची गुपितं ह्याचं नातं अगदी पक्कं झालं ते ह्याच दिवसांत.


हळूहळू गुपितांची संख्या आणि वयं सुद्धा वाढायला लागली.  
“आपल्या गणिताच्या बाईंचे लग्न ज्युनियर कॉलेज मध्ये शिकविणार्या सरांशी ठरले आहे”
“ त्या तिच्या ऐवजी मला नाचात घेतलं, म्हणून ती माझ्याशी बोलत नाहिये”


ती तिच्या जवळच्या मैत्रिणीला अगदी आपल्या मनातलं खूप जपून ठेवलेलं गुपित सांगायची, खुप उत्साहाने आणि कौतुकानं, अणि दुसर्या क्षणाला तिला जाणवायचं, की ते आता तिचं गुपित “गुपित” राहिलं नाहिये.  स्वत:शिवाय कुणाला तरी सांगितल्या शिवाय, त्या गुपिताचं अस्तित्व तरी कसं मानायचं आणि कुणाला तरी सांगितल्या नंतर ते गुपित, “गुपित” तरी कुठं राहिलं?
मैत्रिच्या नात्याची बांधिलकी त्या व्यक्तीशी असलेल्या गुपितांच्या अनुबंधाची हे ही तिला एका क्षणी कळून चुकलं.
“ब सेक्शन मधला नवीन आलेला मुलगा स्वत:हून माझ्याशी बोलला”
“आपल्या वर्गातल्या तिचं आणि कुणीतरी त्याचं काहीतरी सुरु आहे, मी त्यांना परवा शाळा सुटल्यानंतर बघितलं”


शाळा संपून कॉलेज मध्ये मैत्रिणी बरोबर मित्र पण आले, आता तिची गुपितं म्हणजे तिचा मौल्यवान ठेवा होता. तिला समृध्द करणारा. आणि तिच्या सगळ्या गुपितांमधला मौल्यवान असं म्हणजे तिच्या मनातलं “त्या”चं गुपित“, सगळ्या जपलेलं, रुजवलेलं, व्यवहाराच्या पाणी-पाऊस पासून जीव पणाला लावून सुरक्षित ठेवलेलं असं हे गुपित. तिचं आतापर्यंतच्या आयुष्यातलं सर्वस्वी तिचं असणारं गुपित म्हणजे “तो”!  


काही दिवसांनी “तो” तिचा झाला पण ते तिचं गुपित आता “गुपित” राहिलं नव्हतं आणि तिला पुन्हा रिकामं वाटलं, पण ते दिवस फुलपाखरी होते, ते “रिकामं वाटण्याचं” गुपित तिच्या मनातच राहिलं.

त्याच्या मिठीमध्ये विरघळता विऱघळता, एकदम तिला त्या गुपिताची जाणीव झाली, आणि ती म्हणाली, “ए, तुला माहितीये, आपली गुपितं ना, तार्यासारखी असतात, मनामध्ये लुकलुकणारी, आणि त्यातली काही हळूवारपणे अस्तंगत होणारी”.

तो म्हणाला: “तूच एक गोड गुपित आहे बघं, कळून सुद्धा न कळणारं”, आणि ती खुदकन हसली. इतकी वर्षे गुपितांच्या प्रेमात पडून आता तीच एक गुपित झाली होती.