Saturday, June 15, 2013

अपघात

"मराठी विश्वकोषा" त अपघाताची दिलेली व्याख्या:

अपघात: स्वत:ची कुठलीही चूक नसताना ज्या घटनांमुळे मनुष्याला इजा किंवा हानी पोहोचते, 
क्वचित मृत्यूही येतो, अशा आकस्मिक व अकल्पित घटनांना ‘अपघात’ असे म्हणतात. घर, शेत, 
वाहतूक व्यवसाय इत्यादींमध्ये संबंध येणाऱ्‍या वस्तूंत अथवा उपकरणांत बिघाड झाल्याने व्यक्तिगत 
अपघात होतात. भूकंप, पूर, वादळ यांसारख्या नैसर्गिक दुर्घटनांमुळे सामुदायिक अपघात होऊ शकतात. 
सर्पदंश, सुरुंगामुळे उडालेल्या दगडाने इजा होणे, पाण्यात पाय घसरून पडणे ही  यदृच्छा घडणाऱ्‍या 
व्यक्तिगत अपघातांची उदाहरणे म्हणता येतील.

ह्या व्याखेत न बसणारे अनेक अपघात आपल्या आजूबाजूला होत असतात, त्या अपघातांच्या आमच्या 
हाती आलेल्या ह्या काही बातम्या:

गेल्या मंगळवारी,  श्रीयुत काळमारे यांच्या भावनेचा ट्रक घरी येताच पोरांच्या गोंधळामूळे उलटला. ह्या 
अपघाताचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तरीही ऑफीसमधल्या कटकटींनी असहनीय उंची 
गाठल्यामूळे श्रीयुत काळमारे यांचा भावनाब्रेक निकामी होऊन हा अपघात झाला असावा, असे  काही 
जाणकारांचे मत आहे. ह्या अपघातात जखमी झालेल्या भावनांची संख्या ५ वर पोहोचली असून त्या 
दोन लहान मुलांच्या भावनांचा समावेश आहे. शेजारचे हितचिंतक रहिवासी श्रीयुत भोकरे हे ताबडतोब 
अपघातस्थळी पोहोचले आणि त्यांनी श्रीयुत काळमारे यांना योग्य ते पेय प्यायला देऊन त्यांच्या भावना 
काबूत आणल्या आणि भावनेहिंसेचा संभाव्य धोका टाळला. त्यांचे हे कृत्य प्रशंसनीय आहे असे मत 
जनमानसात ऐकू येत आहे. मात्र श्रीमती काळमारे यांच्याशी याबाबत संपर्क साधला, त्यावेळी 
त्यांनी श्रीयुत भोकरे यांच्या कृतीचे खरे कारण  श्रीयुत काळमारे यांच्या भावनां काबूत ठेवणे हे नसून 
त्या विशीष्ट पेयप्राशनामधली त्यांची अतिरिक्त आवड हे आहे, असे आश्चर्यजनक वक्तव्य केले. 

"सहनिवास" सोसायटी" तील  अपार्टमेंट ३-ब मध्ये  गेले बरेच दिवस रहदारीचे सर्व नियम सांभाळून
 तिच्या व त्याच्या आत्तापर्यंत सुरळीत सुरु असलेल्या भावनिक वाहतूकीत आज एका अपघाताने खंड 
पडला. रात्रीच्या जेवायचे काय करायाचे ह्या मार्गावर तिच्या आणि त्याच्या भावना विरुद्ध दिशेने 
आल्यामुळे हा अपघात घडला असावा असा आमचा कयास आहे. सुदैवाने वेळ रात्रीची असल्यामूळे
काही तासांच्या खोळंब्यानंतर तिच्या आणि त्याच्या मधील भावना  वाहतूक लवकरच सुरळीत झाली 
असे आमचे बातमीदार कळवतात.

भांडूप पूर्व  मधील "सुखसंसार" ह्या वसाहतीत, काल संध्याकाळी आणखी एका भावनिक अपघाताची 
नोंद करण्यात आली. कुमठेकर परिवारातील जुन्या त्यामुळे जाणत्या, अनुभवी, कर्तृत्ववान सासूबाईच्या 
भावनांना त्यांच्या मागून  नविन, कोर्या करकरीत सुनेच्या भरधाव येणार्य़ा भावनांनी मागून येऊन धडक 
मारली. ह्या दोन भावनांमध्ये एका पिढीचे अंतर असूनही हा अपघात झाला ह्याचे कारण  सुनेचा भावनावेग 
हेच आहे अशी जेष्ठ नागरिक वर्तुळात चर्चा आहे. ह्या अपघातात मुख्यत: सासूबाईच्या भावना जखमी
झाल्याचे कळते. त्यांना ताबडतोब  सांत्वना केंद्रात नेऊन सहानुभूतिचे उपचार सुरु केले आहेत. श्रीमती 
कुमठेकर यांच्या जखमा वरुन किरकोळ स्वरुपाच्या दिसत असल्या तरी त्यांचे घाव बर्याच खोलवर गेल्याचे, 
आमच्या खात्रीलायक बातमीदाराकडून समजते.
सध्या कुमठेकर कुटुंबातील भावना वाहतूक नियंत्रीत करण्याचे बरेच निकराचे निष्फळ प्रयत्न कुमठेकर 
कुटुंबातील पुरुष सदस्य करीत असल्याचे कळते. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कराव्या लागणार्या 
तरतूदींबद्दलही कुमठेकर कुटुंबात चर्चा सुरु आहे असे आमच्या वार्ताहरास सांगण्यात आले.

कडाक्याच्या उन्हाळ्यात स्वप्ननगरीतील एका नवपरिणित दांपत्यांच्या घरी आज सकाळी तिच्या 
भावनांना पूर आल्यामुळे त्यांचे घर त्या पूरात न्हाऊन निघाले. त्याला बरीच महत्वाची कामे असूनही 
तिच्या भावना पुरामूळे त्याच्या भावनांना थारा मिळाला नाही, पर्यायी त्याचे बरेच व्यावसायिक नुकसान 
झाले आहे, असे समजते. हा भावनापुर त्याने गेले काही दिवस केलेल्या दुर्लक्षाचे फलित आहे, असे मत 
जाणकारांनी व्यक्त केले आहे. ह्या भावनापुरातील हानीची भरपाई मी कुठल्या तोंडाने कुणाकडे
मागू असे त्याने टाहो फोडून विचारताच, त्याला कुणीच उत्तर देऊ शकले नाही. उपस्थितांपैकी 
कुणीतरी "आपलेच दात आपलेच ओठ … " असे काहीसे पुटपुटत होते असे आमच्या बातमीदाराने 
नमूद केले आहे.

काल रात्री हाती आलेल्या वृत्तानुसार कुठल्यातरी पेठेत काल संध्याकाळी घडलेल्या अपघातात 
जखमी झालेल्या भावनांची संख्या २ हून ३ वर पोहोचली अाहे. काल दुपारी चार च्या सुमारास ही 
घटना कुठल्यातरी कुटुंबात घडली. कुंटुबातील वडील आणि मुलाच्या भावना गावाकडून आलेले 
५ लाख रुपयांची रक्कम कशात गुंतवावी ह्या बाबत सुरु असलेल्या चर्चेत एकमेकांना बाजूने चाटून 
गेल्या. दोन्ही भावनांचा वेग बराच असल्यामुळे अपघाताचे पडसाद घरादाराला जाणवले. सुदैवाने, 
दोन्ही कडच्या भावना लवकरच सावरल्या गेल्याने, पुढची भीषण घटना टळली. कालपर्यंत
यांत वडिल आणि मुलगा यांच्याच भावना दुखावल्या गेल्या आहेत असे वृत्त होते, आज त्यात  
आईच्या भावनांचा समावेश झाल्याचे कळते. अपघातींची वैद्यकीय तपासणी केली असून सर्व 
भावना धोक्या बाहेर असल्याचे आमच्या वैद्यकीय चमूकडून सांगण्यात आले. ह्या बातमी मुळे 
त्या घरातील इतर रहिवासींनी सुटकेचा निश्वास टाकला.

या बरोबरच आजच्या बातम्या संपल्या. पुन्हा भेटूया आमच्या संध्याकाळच्या सभेत साडेसात वाजता.

धन्यवाद !