तो सावकाश काठी टेकवत बागेतल्या बाकावर येऊन बसला,
सायंकाळाच्या सावल्या त्याला सहज दिसू लागल्या!
त्याची ती, गेल्या ५५ वर्षांची सांगाती त्याची वाट बघत होती,
मैत्रिणींच्या घोळक्यातून तिची थकली नजर त्याला शोधत होती.
हलवून हात त्यांनी एकमेकांना दुरुन इशारे केले,
तिने दाखविले तुम्ही तिथेच थांबा, मी लवकरच येते,
त्याने पण सांगितले हो हो ये सावकाश मी आहेच इथे
आता तिची वाट बघणे त्याने सुरु केले.
ती जरी दूर होती, दृष्टी त्याची अधू होती
तरि तिची तरुणाई त्याच्या मनात ताजी होती
आतापर्यंत कितीदातरी मनात येऊन गेलेलं त्याला पुन्हा आठवलं,
तिच्या बरोबर राहण्याच्या निर्णयाचं गणित त्याला अचूक जमलेलं.
फुलपाखरी ते दिवस होते, तरीही परिस्थितीच्या बेड्या होत्या
शिक्षण अजून राहिलं होतं, घरचं चित्र कळाहीन होतं,
ती घरात आली तर, त्या चित्रात ती मावेल असं वाटत नव्हतं
त्याला ती आवडत होती, पण तसा निर्णय घेण्यासारखं
काही घडलंही नव्हतं!
एकदा असेच ते कॉलेजच्या कॉरिडॉर मध्ये भेटले,
तिचा उतरलेला चेहरा पाहून, त्याच्या मनात काहीतरी हललं,
त्याला तिच्या मनात काय आहे हे अजून नव्हतं कळलं,
म्हणून त्याने मनातलं सगळं मनातच ठेवलं.
कॉलेजचा शेवटचा दिवस जवळ आला,
त्याने व्यवहाराची कास धरुन, एक नक्की ठरवलं,
तिला एकदा शेवटचं भेटून,
निखळ मैत्रीची खूण तिला पटवणं !!
त्याने तिला एकदा भेटशील कां, म्हणून विचारलं,
तिनंही थोडंसं चाचरत हो म्हटलं,
उद्या ? संध्याकाळी? कॉलेजच्या मागच्या बागेत?
सगळं कसं आपोआप ठरलं !
तिला काय सांगावे हे पक्के ठाऊक होते त्याला,
“तुझी मैत्री ही एक मौल्यवान ठेवा,
शुभेच्छा तुझ्या भविष्याला !!”
हेच तो तिला सांगणार होता,
मनातलं ते फुलपाखरु हळूच उडवून लावणार होता!
ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी तो पोहचला,
पण ऐनवेळी त्याचा एक मित्र मध्येच कडमडला
त्याला कसबसं कटवून तो त्यांच्या ठरलेल्या जागी
जरा उशिराच धडकला
त्याने तिला दुरुनच परत जातांना पाहिलं होतं,
मनात त्याच्या कुठेतरी चुकचुकलं होतं,
पण साधाच निरोप तो
कधीही घेता येईल,
असं त्यानं सहज स्विकारलंही होतं.
आता घरी परत जावं याच विचारत तो
त्यांच्या ठरलेल्या बाकाशी तो पोहचला
त्या बाकावर एक गुलाब पाहून,
स्वत:च्या नकळत हसला.
पण त्या गुलाबाने मात्र त्याच्या
मनातले फुलपाखरु जागे केले,
तिच्या फक्त मैत्रीपर्यत थांबणे,
ते त्याला नाही जमले..
मग नंतर गोष्टी एखाद्या कथेतल्या
सारख्या घडल्या, तो तिच्या घरी गेला,
तिने लाजत हो म्हटलं,
तिच्या अंगणात भर ऊन्हात, चांदणं पसरलं.
त्या चांदण्यात तो आयुष्याभर न्हायला,
तिने ठेवलेल्या त्या गुलाबाची खूण
आपण जाणवून, लगेच निर्णय घेतला
याचा अभिमान त्याला सुखावून गेला.
मैत्रिणींच्या घोळक्यातून ती ही त्याला बघत होती,
त्याने आयुष्यभर दिलेल्या प्रेमाची उब
दुरूनही तिला जाणवत होती.
कुणीतरी डोक्यात गुलाबचं फुल लावलं होतं,
ते बघून तिला त्याने त्या संध्याकाळी तिच्यासाठी ठेवलेलं फुलं आठवलं.
तो तिला आवडायचा की नाही, हे तिला नक्की अजून समजलं नव्हतं,
पण तो एक चांगला मित्र आहे
ह्यात तिचं दुमत नव्हतं.
भेटायचं कां असं जेव्हा त्यानं विचारलं,
तेव्हा “तू एक चांगला मित्र म्हणून नेहमीच लक्षात राहशील”
हे त्याला सांगायचं,
असं तिनं केव्हाच ठरवून टाकलं.
ठरलेल्या दिवशी, ती ठरलेल्या ठिकाणी पोहचली,
त्तिच्या नजरेने त्याला शोधतांना
तो दिसला तिला,
दूरवर त्याच्या मित्राशी पाठमोरा बोलतांना,
आणि इतक्यात तिची नजर पुढ्यात गेली
त्या बाकावर दोन गुलाब पाहून,
ती मनाशी खुदकन हसली
आणि त्याची ती अनोखी भेट पाहून हरखली
नेमके घरी पाहुणे येणार,
म्हणून तीला परत जाण्याची घाई,
त्याच्या पाठीकडे पहात
तिला अगदी सुचेना काही.
पण घरी जाण्याच्या घाईने अधिक थांबवेना,
म्हणून एक गुलाब घेऊन ती
त्यांला अबोल गुलाबी निरोप देत
मोरपिसा सारखी तरंगत घरी पोहचली.
मग नंतर गोष्टी एखाद्या कथेतल्या
सारख्या घडल्या, तो तिच्या घरी आला,
तिने लाजत हो म्हटलं,
तिच्या अंगणात भर ऊन्हात, चांदणं पसरलं.
त्या चांदण्यात ती आयुष्याभर न्हायली,
त्याने ठेवलेल्या त्या गुलाबाची खूण
मनोमनी जाणवून, आपण लगेच निर्णय घेतला
याची तिला जाणीव तिला सुखावून गेली.
दोघांनाही आयुष्यात साथ देत राहिलं
स्वत:च्या वेळेवरच्या निर्णयाचं कौतुक
आणि स्वत:च्या निर्णयक्षमतेबद्दल अभिमान,
आणि त्यावरच पोसला गेला आयुष्यभर
त्यांचा आत्मविश्वास!त्या ठरलेल्या दिवशी, त्या बागेतला माळी
मात्र चक्रावला होता,
आत्ता ह्या बाकावर ठेवलेली दोन गुलाबाची फुलं,
बघता बघता नाहीशी कशी झाली,
याचा विचार करत बसला होता !!!!!
लमाल एप्रिल २०२० "निर्णय"