Sunday, April 28, 2013

शोधयात्रा


शोधा म्हणजे सापडेल ह्या उक्तीला आपापल्या कुवतीनुसार
प्रत्येकजण वापरत असतो.

कधी हरविलेल्या स्वत:ला शोधायला 
तर
कधी हरविलेली पेन्सिल शोधायला
आणि
कधीतरी आयुष्याला चिकटून राहण्यासाठी आवश्यक असलेले,
भावबंध शोधायला
किंवा
परर्फेट दह्याची परर्फेट कृती शोधायला!

एखादा शास्त्रज्ञ ज्या निष्ठेने आकाशाला भिडेल एवढ्या डेटाच्या ढिगाऱ्यातून
ज्ञानाची सुई शोधत असतो, त्याच निष्ठेनं प्रत्येकाची शोधयात्रा सुरु असते.
शास्त्राच्या कसोटीवर सिद्ध करता येण्याजोगे हे शोध नसतात, पण
प्रत्येकाला या यात्रेत स्वत:पुरते खरे असे शहाणपणाचे शोध लागत असतात.

काही वेळेला न हरवलेली वस्तू सापडते,
काही वेळेला शोधत नसलेली वस्तू समोर येऊ ठाकते,
काही वेळेला सापडलेली वस्तू, हरवणे ते सापडणे ह्या प्रवासात ओळखू 
न येण्याइतपत बदललेली असते,
आणि
काही वेळेला हरविलेली वस्तू सापडूनही, तिचा शोध मात्र स्वत:च्या 
कळत/नकळत सुरुच राहतो.

हरवणे, शोधणे आणि सापडणे ह्या चक्रात ही शोधयात्रा सुरु असते.
इथे प्रत्येकजण सिंडरेला आणि प्रत्येकाचा बूट हरवलेला !!