आज ज्या समस्येबद्दल मी सांगणार आहे, ती समस्या तशी गंभीर आहे, लमाल सत्रामध्ये भाग घेण्यार्या सगळ्यांनाच ही भेडसावते असे नाही, पण काही थोडक्या लोकांना वेळच्या वेळी कामे करणे किंवा लिखाणासाठी वेळ वेगळा काढणे ह्या असल्या वाईट सवयींमुळे ह्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. “गंभीर” ह्यासाठी की एकदा सवयीचा गुलाम झाल्यावर अंगात बेशिस्त बाणविणे कठीण होऊन बसते.
म्हणूनच तर मी माझी अत्यंत महत्वाची कामे सोडून हे लिहायला बसले आहे. अत्यंत महत्वाची कामे यांत व्हॉटसऍप वरचे सगळ्या ग्रुपवरचे सगळे ज्योक्स वाचणे एवढेच येत नसून फेसबुक वर रॅण्डम लोकांनी टाकलेले रॅण्डम विडीओज बघणे, कुणाचे तरी टॅग केलेले फोटो बघत बघत, ह्याच्या त्याच्या पेजवर उड्या मारत, शेवटी सुरुवात कुणाच्या फोटोवरुन केली होती हेच विसरून जाणे, तसेच इतर लोकांना आवडलेले कपडे, फोटो, फुलं, पाने ह्यासाठी आपली नसलेली आवड दाखविणे, हजारदा वाचलेलं जीवनावश्यक तत्वज्ञान दरवेळी वाचतांना पहिल्यांदाच वाचतोय आणि क्षणात आपलं आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी कशी बदलली ह्या अनुभुतीची पुनरावृत्ती घेणे, हे आणि असे इतर सगळे आले.
तर ही समस्या आहे, लमाल सत्रा मध्ये वेळेवर लिखाण करण्याची.
लिखाण कसे करावे ह्या बद्दल तुम्हाला हवी तितके उपाय सांपडतील पण लिखाण न करण्यासाठी मात्र तुम्हांला माझ्या ह्या अभिनव उपायांचीच मदत घ्यावी लागेल.
पहिल्या प्रथम, लमाल सत्राअखेरीस पुढच्या सत्राच्या विषयाची निवड झाल्यानंतर, एकंदरीत लिखाणा/लेखन या बद्दलचा तुमचा जो काही उत्साह असेल, तो लगेच पुढच्या तासाभरात त्यावर वाटत असलेले, नसलेले सगळे विचार बोलून दाखवून वापरुन टाकावा. आपण आतापावेतो (न) केलेल्या लिखाणाचा किंवा वाचनाचा आणि आपण बोलत असल्याचा काहीएक सबंध नाही हे पक्के लक्षात ठेवावे. त्या तुमच्या उत्साहावरुन तुम्ही पुढच्या लमाल सत्राला हातासरशी एक दीर्घकथा, जाता येता एखादी गोष्ट किंवा निदान एखादा भरभक्कम लेख तरी नक्की लिहालच अशी इतरांची तशीच तुमची पण खात्री पटते. मग त्या दिवशी घरी जाऊन आदल्या दिवशी जे वेळेवर लिखाण केलं असतं त्यामुळे आणि पुढच्या सत्राच्या लिखाणाबद्दल (अति) उत्साहाने बोलण्यामुळे अतिशीण येऊन “खूप झाली बाबा मराठी साहित्यसेवा” असं म्हणत “हाश्श हुश्श” करीत राहावं, ते थेट लमाल पदाधिकार्यांची लमाल सत्राला ३/४ अाठवडे राहीले आहेत, अशी इ-मेल येईपर्यंत.
आता ह्या ठिकाणी, तुम्हांला मनाचा निग्रह करुन, ती ई-मेल पाहून तात्काळ न वाचता ती मेल जणू आलीच नाहीये, आणि तुम्ही ती पाहिलीच नाही असे स्वत:ला सांगायचे आहे. सुरुवातीला असे पाहून न पाहणे कठीण वाटेल, पण जमेल हळू हळू. एकदा ह्या ई-मेल कडे तुम्ही दुर्लक्ष करु शकलात की तुम्ही “न लिहीणे” चा अर्धा गड जिंकलात.
पुढचे २/३ आठवडे जातील, पण पुन्हा अत्यंत महत्वाच्या कामांमुळे तुम्ही लमाल चा विषय मनातसुद्धा न आणता बिनधोक पणे जगू शकता. चुकुन माकून त्याची अाठवण झालीच, तर आपले तावातावाचे उत्साहाने बोलण्याच्या आठवणीत रमून जावे आणि “लिखाणाचा विषय अाणि त्यावर विचार” ह्या असल्या क्षुल्लक गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.
लमाल सत्राला एक आठवडा उरला असतांना पुन्हा एकदा लमाल पदाधिकार्यांची RSVP ची इ-मेल येईल. मग आठवड्यातला किंवा विकेंडच्या एखाद्या शुभ दिवशी दिवसभर हाईकिंग, भटकंती, बोर्डगेम्स आणि काहीच न जमल्यास नेटफ्लीक्स वर कुठल्या तरी शोचे बिंज वॅाचिंग करणे, या सगळ्या कामानंतरच रात्री खुप उशीरा लमाल सत्राच्या विषयाबद्दल सुमारे दोन ते तीन मिनीटे विचार करावा. एकंदर वेळ आणि परिस्थिती बघता, काय लिहावे याबद्दल काही सुचणार नाही, मग गुगलं शरणं गच्छामी ह्या सवयीप्रमाणे लमाल सत्राच्या विषयासाठी गुगल सर्च मारावा. हो जसा सर्च लाईट चा झोत मारतात, तसा हा सर्च ही मारतात. त्यामुळे तो कधी कधी लागतो. आणि डोळे ताणत ताणत इंग्लिश/ हिंदी/मराठी अशा सगळ्या भाषेतले भांडार गुगलने उधळले असते त्यात नक्की आपण काय शोधत आहोत यांचाच विसर पडतो, मग ताबडतोब, काहीतरी लिहीण्याचा मोह होण्याच्या आत, पटकन लॅपटॅाप बंद करुन झोपी जावे.
पुढचे २/४ दिवस जगातले इतर सगळे विषय कसे आपल्या सर्जनशीलतेला पूरक आहेत आणि ह्यावेळेला निवडलेला विषय कसा मारक आहे याची जाणीव स्वत:ला करुन देण्याचा प्रयत्न वारंवार करावा. लिहायचे आहे ह्याचे दडपणही वाटू शकेल, पण घाबरुन जायचे कारण नाही. अशावेळी सत्र कुणाकडे आहे, जायला किती वेळ लागेल, मेनू कसा असेल, कोण येईल, कोण नाही असे विचार मदतीला येऊ शकतात. किंवा जवळच्या लोकांकडे विषयाच्या निवडीबद्दल चे आपले अवेळी जाणवलेले असमाधान मनसोक्त व्यक्त करावे.
मग सत्रास दोनच दिवस उरले आहेत, अशी वेळ येऊन ठेपते. बघा, आतापावेत्तो, जमलं की नाही न लिहीणं?
आता मात्र लिहीण्या शिवाय काहीच तरणोपाय नसतो मग लमाल सत्राच्या आदल्या रात्री किंवा सत्र दुपारी असेल तर दुसर्या दिवशी सकाळी लिहायला सुरुवात करावी. सरस्वती आपल्या हाकेची वाटच बघतेय हा आपला भ्रम लगेचच खोटा ठरेल, तरी सुद्धा घाबरायचे नाही.
सुरुवातीला विषयाशी यमक जुळणारे शब्द लिहून बघावे. जर आठ एक ओळींची कविता त्या निघाली तरी काम फत्ते. कविता लिहीण्याचे बरेच फायदे आहेत. या ठिकाणी कविते साठी “करणे” च्या ऐवजी “लिहीणे” हे क्रियापद वापरलेले आहे हे आपल्या चाणाक्ष नजरेस आलेच असेल. तर कविता लिहीण्यास वेळ कमी लागतो तसाच कविता वाचण्यास पण. त्यामुळे कविता सगळ्यांच्या आवडीची. त्यात कविता समजणे म्हणजे ते मारुतीच्या बेंबीत गार लागतंय सारखा प्रकार, त्यामुळे, ती कशी चांगली होती किंवा नव्हती ह्याबद्दल कुणी खोलात जाऊन बोलत नाही.
कविता नाही जमली तर मग तो काल रात्रीचा गुगल सर्च चा टॅब पुन्हा बघावा, आणि त्यात अजिबात नसलेलं,
आणि मनाच्या कोपर्यातलं काहीतरी खरडवून काढून लिहावं. आणि “चला बाबा झालं एकदाचं” म्हणून अतीव समाधानाचा निश्वास टाकावा. कारण इतर काही करण्यासाठी वेळच उरलेला नसतो, त्यामुळे तुम्ही एवढंच करु शकता.
असे वेळेवर लिखाण केल्यामुळे सगळ्यांसमोर ते लिखाण ताजे ताजे सादर करता येते. ते जर गुगल ड्रॉइव वर टाईप केलेले नसेल तर हस्ताक्षरामुळे त्याला एक प्रकाराचा जिव्हाळ्याचा पदर जाणवतो. तसेच त्या लिखाणाला पुनर्वाचन, सुधारित वाक्यरचना, क्रियापदांच्या योग्य रुपांचा वापर असल्या दांभिक सुधारणांचा वासही येत नाही. तर हे होते, “ वेळेवर लमाल लिखाण करणे” ह्या समस्येवरील उपाय. आपण जरुर हे उपाय अंमलात आणू शकता आणि आपले लिखाण ताजे, गरम बनवू शकता, पहिल्या (न) जमलेल्या तळणाच्या घाण्यासारखे !
No comments:
Post a Comment