लहानपणा पासून मला वळण लावण्याचे अनेकांनी अतोनात प्रयत्न केले. विशेषत: माझ्या आईने पण तिच्या अथक प्रयत्नांनी माझी इतर भावंडे अगदी वळणदार झाली, आणि भांवडेच काय आमच्या घरातील कुत्रा आणि शेजाऱ्यांच्या मांजरीलाही ही वळण लागले. म्हणजे तेव्हा अगदी ही तुमची alexa जर असती आमच्या घरी तर तिला सुद्धा वळण लागले असते, पण मी मात्र आपली मी तरिही अगदी सरळच राहिले.
आईचं वळण तर मला वळसा घालून गेलं, पण “ हिंदी चित्रपट गीते” ह्या एका स्रोतामुळे आयुष्यातले अनमोल धडे मला मिळाले. त्यातला एक अत्यंत महत्वाचा म्हणजे, आयुष्यातल्या धोकाच्या वळणांबद्दलचा.
सोळावं वर्ष लागलं की एका रात्रीत काहीतरी आमूलाग्र बदल होऊन आपल्या आयुष्याच्या वाटेवर “ते” धोक्याचं वळणं
लागतं, आता “ते” म्हणाजे तुम्हाला कळलं नसेल तर, जरा ह्या ओळींवरुन ते स्पष्ट होईल:
मै सोला बरस की तू सतरा बरस कां, मिल ना जाये नैना
एक दो बरस जरा दूर रहना, कुछ हो गया तो फिर ना कहना !
किंवा माझ्या आधीच्या पिढीतले तुम्ही असाल तर, हे ऐका:
जवानी मस्त है डगर, जरा संभल के चलो ...ये बेखूदी का है सफर, जरा संभल के चलो
हे जरा जास्तीचं जुनं वाटलं असेल तर हे ऐका:
चुनरी सम्भाल गोरी, उड़ी चली जाए रे
मार न दे डंक कहीं, नज़र कोई हाय
देख देख पग न फिसल जाए रे
मग आता कळतंय कां मी कशाबद्दल बोलतेय ते. म्हणजे त्या वयात आल्यावर काहीतरी वाटणार हे नक्कीच आहे, पण तरिही हे “धोक्याचे वळण” कसंही करुन टाळायलाच हवं, हे हिंदी चित्रपट गीतांनी इतक्या विवीध तऱ्हेने मांडले आहे की ही सर्जनशीलता पाहून नतमस्तक होण्याखेरीज आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही.
हे ऐका:
थोडासा ठहरो, करती हू तुमसे वादा पुरा होगा तुम्हारा इरादा,
मै हू सारी सारी तुम्हारी फिर काहे तो जल्दी करे
ह्या ओळींमध्ये तर “सब्र का फल मिठा होता है” ह्या उक्तीप्रमाणे ती म्हणजे एखादी “winning trophy” च आहे, आणि
थांबल्यातरच ती मिळते हे सांगितले आहे.
हाच “धोक्याचे वळण जरा थांबा” चा इशारा ह्या गाण्यातही मांडला आहे,
ये कली जबतलक फुल बनके खिले, इंतजार इंतजार इंतजार करो इंतजार करो
इंतजार वो भला क्या करे तुम जिसे बेकरार बेकरार बेकरार करो
यात तर हिंदी सिनेमावाल्यांच्या अत्यंत आवडीची प्रतिकं, म्हणजे कळी, फुलं वापरली होती. काय म्हणता “आवडीची” कशावरुन? हा घ्या पुरावा:
अठरा बरस की कंवारी कली थी , घूँघट में मुखड़ा छुपाके चली थी
फँसी गोरी, फँसी गोरी चने के खेत में, हुई चोरी चने के खेत में
इथे त्या अठरा वर्षाच्या कळीची झालेली फसवणूक आणि कशाची तरी झालेली चोरी ही किती आनंदी स्वरात
सांगून तुम्हाला सावध केल्या गेलंय.
आणि पुन्हा तुम्ही जर माझ्यासारखी कानावर पडेल तेव्हा आणि पडेल ती गाणी ऐकली असशील तर हे ही तुम्हांला
माहिती हवं:
कच्ची कली कचनार की क्या समझे की बाते प्यार की
…. आने को दे ऋतु बहार की
कळी चे फुल होणे ह्याच प्रतिकाचे पुढे म्हणजे कळीचे फुल झाल्यानंतर पण दोन फुलं एकमेकांवर आपटतांना दाखवून त्यांनी “ते” धोक्याचे वळण यशस्वी रित्या (म्हणजे नक्की काय ते विचारु नका) टाळले आहे असा संदेश अल्पमती प्रेक्षकांना देतात.
हयात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे फक्त समाजच हा “संस्कृती रक्षकाचे” काम करित नव्हता तर प्रेमाच्या आणाभाका घेतलेला प्रियकर सुद्धा हे कार्य इमाने इतबारे पार पाडीत होता:
आँखों आँखों में आँखों आँखों में बात होने दो
मुझको अपनी बाहों मे सोने दो
शादी हो जाने दो
शादी हो जायेगी ….
मुखातून सावधगिरीचा इशारा आणि तो इशारा धुडकावून लावण्याची पडद्यावरची कृती हे एकाच गाण्यात दाखवून, ह्या हिंदी चित्रपट गीताने एक वेगळीच उंची गाठली आहे:
रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना
भूल कोई हमसे ना ना हो जाये ...
तो इशारा टाळल्यानंतर चे अटळ प्राक्तनाचे दर्शन आपल्याला ह्या चित्रपटात घडले होते.
तर माझी आशा आहे की आपणही ही असली हिंदी चित्रपट गीते ऐकली असतील आणि योग्य वयात “धोक्याच्या वळणांचा” इशारा तुम्हांला ही मिळाला असेल. अर्थात ही गाणी ऐकून तुम्हांला ती धोक्याची वळणे टाळाविशी वाटली होती की त्या वळणांनी तुम्हांला मोहीत केलं होतं हा हिशोब तुमचा तुमच्यासाठी.
लमाल जून २०१९ "वळण"
No comments:
Post a Comment