Saturday, February 22, 2020

उंबरठा आणि ती

 उंबरठा म्हटलं की ती आठवते, तिच्यासाठी नसलेलं तिचं घर आठवतं!  जवळपास ३८ वर्षांआधी

पडद्यावर साकारलेली तिची जेमतेम दोन तासांची गोष्ट आठवते!


सुरुवातीच्या एका मिनिटभरात भरलेल्या घरात ती आतून रिकामी आहे हे तिच्या १/२ अस्फुट
वाक्यांवरुन खोलवर जाणवतं. तिचा वावर घरभर आहे पण तिची स्वत:ची अशी जागा ती शोधते आहे.
कधी बाहेरच्या बागेतल्या पाळण्यावर, तर पोर्चच्या बाजूच्या बाकावर. 


घरातल्या सगळ्यांना त्यांच्या आयुष्याचं गमक सापडलंय, हिला मात्र नाही.  स्वत:ला काय हवंय
याबद्दल तिच्या मनात जरासुद्धा संभ्रम नाही. म्हणूनच नावाजलेल्या सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या
तिच्या सासूबाई त्यांच्या अपंगासाठी करत असलेल्या संस्थेत तिनं यावं असं सुचवितात, तेव्हा काही
काळ तसा प्रयत्न करुन ती ते थांबवते, जे मला करायचे आहे ते हे नाही म्हणून. तिला एक गोड मुलगी
आहे, पण तिची थोरली जाऊ प्रेमळ आणि निपुत्रिक. त्यामुळे हिच्या एकुलत्या एका मुलीवर आईप्रमाणे,
किंचित आईपेक्षा जास्तच जीव. तिथे ही आपल्या अपत्यप्रेमाचा मालकीहक्क गाजवू शकत नाही. तिला
जे हवंय त्या जवळ पोचेपर्यंतचा प्रवास मात्र तिला तिच्या वर्तमानापासून, रोजच्या आयुष्यापासून अलिप्त
ठेवतो आहे. 


तिच्या नवऱ्याला तिची घालमेल जाणवते, पण त्यासाठी तो काही करू शकेल असे नाही, आणि त्याला
ही जाणीव असणे, हे तिच्यासाठी पुरेसे नाही.   


खरंतर ती फारशी कधीच काहीच बोलत नाही. काही ठिकाणी तिने अगदी पेटून उठावं, असं आपल्याला
वाटतं त्या प्रसंगात सुद्धा शांतपणे ऐकून ती तिथून उठून निघून जाते. तिचा वकील नवरा विरुद्ध बाजूच्या
स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून एक केस सहजगत्या जिंकल्याचं सांगतो. हा असाच एक प्रसंग. तिला
त्याबद्दल काहीव वाटले नाही असे नाही पण एका पत्नीच्या नात्याचा उंबरा ती ओलांडून ती त्याच्या
व्यावसायिक प्रांतात पाऊल ठेवत नाही. 


अशातच, तिच्याकडे असलेल्या समाजशास्त्राच्या सुवर्णपदकासह मिळालेल्या पदवीच्या जोरावर तिला
दूरच्या एका खेड्यातल्या सरकारी महिला सुधारगृहात अधिक्षिकेच्या जागेवर नेमणूक मिळते. सासूबाई
थांबवायचा  प्रयत्न करतात. पण तिचा नवरा एक वकील म्हणून तिची बाजू घरच्यांसमोर अगदी नेमकेपणाने
मांडतो. घरचे काहीशा नाराजीनेच संमती देतात. तिला अगदी भरुन येतं, मुलीसाठी जीव तुटतो, पण ती जातेच. 


ह्या नव्या जगात जातांना तिच्या मनातले हे शब्द तिच्या विवेकशीलतेची आपल्याला ओळख करुन देतात:

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे 


हा एवढा आदर्शवाद आजकाल आपल्याला सोसवत नाही. आताशा आपल्याला त्याची सवय पण राहिलेली
नाही, पण तिच्याकडे पाहातांना ते तिच्या व्यक्तीत्वाचाच एक भाग बनून येतं, आणि त्या सहजसौंदर्याने
आपण मोहित होतो, हे खरं.


महिलांचे पुनर्वसन करायचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे हे दोन हेतू तिच्या डोक्यात असतात.
त्यासाठी ती नवनवीन उपक्रम राबवते. बेशिस्त महिलांमध्ये शिस्त आणू पाहते. तिला तिचा आत्मा सापडू
लागतो. त्यांचं प्रार्थनागीत सुरु असतांनाचा तिचा वावर म्हणजे देहबोलीचा नितांत परिपूर्ण परिपाठ आहे.
आपल्या ध्येयासाठी स्वत:ला असं सर्वस्वीपणे झोकून देणारी ती नखशिखांत सुंदर भासते. 


ह्या तिच्या संसाराच्या परिघाबाहेरच्या जगात तिला कितीतरी थांबलेली, पिचलेली आयुष्यं दिसतात.
जबरदस्तीने लग्न लावून दिलेल्या म्हाताऱ्या नवऱ्याला सोडून आलेली, असफल प्रेमातून मुलीला जन्म दिलेली
आणि मग आता आश्रम सोडून जावे लागेल ह्या विचाराच्या हताश क्षणी, स्वत:च्या मुलीचा बळी घेणारी,
एकमेकींचा फक्त मानसिक नाही तर शारिरिक आधार घेऊ पाहणाऱ्या आणखीन दोघीजणी!! त्यांची उध्वस्त
आयुष्यं तिच्या परीने ती सावरण्याचा प्रयत्न करत असते. 


आश्रमाच्या घडी बसविण्याच्या कामात ती तिचा सगळा वेळ जात असला तरी एखाद्या रात्री, तिची
कर्तव्यदक्ष नजर चुकवुन काही क्षण तिला हळवं करतातच. नवऱ्याचा आणि मुलीचा फोटो पाहत
तिचं अबोल मन फुलु लागतं. 


सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या..

असं असूनही तिच्या हातातून संसाराची वाळू निसटतच चालली आहे. एकदा तिच्या ध्यानीमनी नसतांना
तिचा नवरा तिला भेटायला येतो. तेव्हा तिला झालेला आनंद तिच्या डोळ्यांमधून ओसंडतो आहे, त्याला
कुठे ठेवू अन कुठे नको असा तिच्या फक्त नजरेतून दिसणारा भाव रोमांचित करतो. पण आश्रमातल्या
स्त्रियांना वाटणारी रेक्टरबाईच्या नवऱ्याला बघायची उत्सुकता आणि काहीशी असूया तिच्या ह्या आनंदाला
जरा लगाम घालतात. त्यात नेमकं त्याच रात्री तिला एका गर्भार बाईच्या अकाली प्रसृतीसाठी रात्री उशीरापर्यत
बाहेर राहावं लागतं. तिच्या बरोबर काही रात्री तरी घालविण्याच्या अपेक्षेने आलेला तो, त्या रात्रीनंतर,
दुसऱ्याच दिवशी परत निघतो, तो तिच्याकडून झालेल्या अपेक्षाभंगाच्या टोचणी घेऊनच. तिला याची
जाणीव असते, पण त्याच्या अकस्मात येण्याचा तिला झालेला आनंद, ती त्याला देता येणाऱ्या वेळेत
मात्र दाखवू शकत नाही. आणि तिला झालेला आनंद हा त्याच्या साठी पुरेसा नसतो. त्याला तिच्याबरोबर
हक्काचा वेळ हवा असतो. 


पुढे उलट सुलट घटना त्या सुधारगृहात घडत राहतात. संस्थांमध्ये होणारा गैरकारभार, तिथल्या आधीच
समाजाकडून, सासरकडच्यांकडून नागवलेल्या गेलेल्या स्त्रियांचं होणारं शोषण. सुधारगृहात चालणारे
अनैतिक धंदे ती उघडकीस आणते, तिथला अन्याय आणि महिलाना दिली जाणारी वागणूक याविषयी
आवाज उठवते. तिला वाटते की आपण रास्त काम करतो आहोत. परंतु प्रत्यक्षात घडते वेगळेच, तिच्या
या आदर्शवादी कारभारामुळे व्यवस्थापन समितीतले सर्व सदस्य तिच्या विरोधात जातात. तरी महिला
सुधारगृहातील महिलांचा आपल्याला मनापासून पाठिंबा आहे हे तिला ठाऊक असते. नेमलेल्या समितीला
पुराव्याअभावी तिच्या विरुद्ध काही कारवाई करणे शक्य होत नाही. पण आता ह्या संस्थेत काम करणे
म्हणजे ह्या व्यवस्थापनाच्या आणि पर्यायाने संस्थेच्या चालकांच्या विरुद्ध लढणे, हे तिला उमजून चुकते,
आणि ती अगदी स्वच्छ मनाने राजिनामा देते, आणि ती तिच्या घराकडे परत निघते....


ती घरी परत येते, तिला आपण ह्या जगाला दुय्यम स्थान दिले होते याची पुरेपुर जाणीव असते, त्यामुळे
परत आल्यावर ती अगदी समरसून त्यात रमू पाहते, पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असतं. मुलीसाठी
तिची काकू म्हणजे आईच झालेली असते. तिची त्याबद्दल तक्रार नसते, गोष्टी बदलतील आणि त्यासाठी
थांबावे लागेल हे तिला समजलं असतं.


पण, पण, एका रात्री तिचा नवरा अगदी प्रांजळपणे “मी तुझ्या इतर गरजा समजून घेऊन तुला स्वीकारलं
आहे, मग तू नसतांना मी केवळ शारीरिक गरज म्हणून एका दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले आहे, आणि फक्त
तू परत आली आहेस म्हणून मी ते तोडू शकत नाही., हे तू समजून घे”. असा प्रस्ताव ठेवतो.

घराबाहेरील जगाने तिच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले त्यांमुळे विमनस्क अवस्थेत घरी परतलेल्या
तिला तिच्या असफल ठरलेल्या निर्णयासाठी बाकी सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची तयारी असते, पण हे
ऐकून मात्र तीचा तिला त्या घराशी बांधून ठेवणारा दोर तुटतो. आपल्या अनुपस्थितीत बायको या नात्याची
अशी जागा भरून निघणे तिला अपेक्षित नसतं. 


सर्व घडामोडीमुळे ती खचून जात नाही अन मनाशी ठाम निश्चय करून ती घराचा 'उंबरठा' परत एकदा
ओलांडते. यावेळेस पुन्हा घरी न परतण्यासाठी ती बाहेर पडते. तिच्या आत्मशोधासाठी ती बाहेर पडलेली
असते... ती रेल्वेत बसून विचार करते आहे आणि तिचा अनामिक दिशेने प्रवास सुरु आहे. 

तिची पडद्यावरची गोष्ट इथेच संपते. पण मनात मात्र ती वेळी-अवेळी डोकावत राहते. 


लमाल फेब्रुवारी २०२० "उंबरठा"

No comments:

Post a Comment