Saturday, August 8, 2020

निसटलेला क्षण

 कित्येक वर्षांपूर्वी अगदी ऐन पावसाळ्यात लोणावळा-खंडाळ्याला गेले होते. धुक्यात लपलेले ते हिरवेगार डोंगर, पावसात न्हाऊन पानोपानी प्रफुल्लीत झालेली ती झाडे, हिरव्यागार डोंगरामधून कोसळणारे ते पांढऱ्याशुभ्र पाण्याचे प्रपात. ह्या अशा स्वर्गीय म्हणावं अशा मनोरम निसर्गदृश्याकडे पाहतांना मला काही क्षण अक्षरश: असुरक्षित वाटलं. ह्या सगळ्या असीम सौंदर्याचा फक्त आस्वाद घेण्याची सुद्धा क्षमता आपल्याजवळ नाही. ह्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली पंचेद्रियांची झोळी फाटकी आहे आहे, असे काहीसे विचार मनात येउन गेले. आपल्या क्षुद्र असण्याची जाणीव नव्याने अस्वथ्य करुन गेली. त्याच मूड मध्ये कुणा जवळच्याला लिहिल्या गेलं, आणि त्याच्या सहज उत्तरातलं वाक्य माझी अनेक वर्ष सोबत करतंय, “अगं आपण त्यातलाच एक भाग नाहीये कां? मग तिथे जाऊन, त्या मनोरम निसर्गचित्राचाच एक भाग होऊन ते अनुभवणं, म्हणजेच त्या सौंदर्याचा आस्वाद घेणं”.


आणि त्यानंतर जिथे शक्य होईल तिथे असे आस्वादाचे क्षण वेचायची  नकळत सवय लागली. 


ह्या क्षणांना सृष्टीची सगळी कडी एकमेकांत गुंफुन एक सलग आकृतीबंध जाणवतो आणि आपण त्यातली एक कडी होऊन बसतो. अर्थात यात आवर्जून करण्यासारखं काहीच नसल्यामुळे हा सगळा अनपेक्षित आनंदाचाच भाग असतो. आणि ह्या शोधप्रवासात जसे शब्दात नेमके न पकडता न येणारे, पण ती एकरुपता अनुभवलेले  क्षण सापडतात, तसेच सगळ्या आवश्यक गोष्टी असूनही काही अबोध कारणांमुळे काही एकरुपतेचे क्षण अलगद हातातून निसटतात. माझ्या बऱ्याचशा निराशावादी स्वभावाचा परिणाम म्हणून की काय मी ते निसटलेले क्षणही मनात कुठेतरी पकडून ठेवलेय, त्यातलाच हा एक.


स्थळ: आता निसर्गाच्या बाबतीत काय डावं-उजवं काय करणार, तेव्हा एक अगदी दाट झाडीत लपलेला नदीकाठ आणि वेळ? वेळ रेंगाळण्याची. पाण्याचा खळखळाट आणि अधूनमधून पक्ष्यांचा आवाज, या पलिकडे कसलाही आवाज नाही, चाहूल नाही, बाहेरच्या जगाशी जोडणारा काही म्हणता काही दुवा नाही. त्या नदी काठावर बॅगपॅकस् काढून संथपणे आजूबाजूला झाडांकडे, जमिनीवर गळुन पडलेल्या वाळलेल्या पानांकडे, इतस्तत:  पडलेल्या दगडांकडे, नदीच्या पाण्याकडे निर्हेतुकपणे पाहत बसले. पाण्यामध्ये हळूहळू उतरत जावे तशी ती नीरवता मनामध्ये अलगद उतरत होती. आणि अचानक माझ्या मनाला बाहेरच्या जगाची चाहूल लागली. आणि त्या सबंधित अनेक विचारांचे भुंगे मनात घोंघावू लागले आणि झालं. प्रत्यक्षात काहीही न घडता मला एकदम त्या निसर्गचित्रात उपरे वाटू लागले. ती झाडे, ती पाने, ते नदीचे पाणी, ते दगड, पक्षांचे आवाज … सगळे कसे परके वाटायला लागले. बाहेरच्या जगाबद्दलच्या विचारांनी जणू माझा त्या एकरुपतेच्या क्षणांपर्यंत पोचण्याचा मार्गच खाऊन टाकला. आता आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टीवरची माझी नजर निर्हेतुक राहीली नव्हती तिला  व्यवहाराचा स्पर्श झाला होता. 


मी ही हा बदल निमूटपणे स्वीकारला. ह्या निसटलेल्या क्षणांत मला माझ्या अनेक आधीच्या आणि पुढे असणाऱ्या एकरुपतेच्या क्षणांचे अस्तित्व रुजले होते.   


No comments:

Post a Comment