"मला लग्न झाल्यावर कमीत कमी तीन वर्षे तरी मुलं नकोयत, मला नवऱ्याबरोबर फ्रेंड टाईम हवाय", असं जेमतेम विशीची अंजू म्हणाली तेव्हा तिचं ते वाक्य खूप liberating वाटलं, निर्णय काय/कसा/योग्य/अयोग्य ह्या पेक्षा तो घेण्याची इच्छा/ विचारक्षमता आहे हे मोलाचं. "चूल आणि मूल" ही गेल्या कितीतरी शतकं स्त्रियांची क्षेत्रं असूनसुद्धा त्या क्षेत्रांसबंधी किती खोलवर विचार सामान्य स्त्री कडून केल्या जातो असं मनात आलं, आणि त्याच क्षणी मनात आला तो "उद्याचा पुरुष" अर्थात "रधों" !
काळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा, लहानपणी वडीलांचे कुणाला तरी सांगितलेले "विसावे शतक हे विज्ञानाचे, ज्ञानाचे असेल" हे उदगार कानावर पडले आणि आयुष्यभर मग विज्ञानाची, ज्ञानाची कास आणि समाजाला काळाच्या पुढे न्यायचा ध्यास!
व्यवसायाने गणिताचे प्राध्यापक असलेले रधों, आयुष्यभर आपल्या पत्नी, मालती बरोबर समाजाला कळत नसलेला किंबहुना झेपत नसलेला म्हणून सतत हेटाळणी/उपहासाचे कारण असलेला समाजसुधारक विचारांचा प्रसार करत झटत राहिले. ज्या समाजासाठी आपण हे करतो आहोत त्या समाजाकडून अपमान, निंदा सहन करत.
आपण आपले अनुभव, विचार, मतं एवढंच नाही अगदी रोजच्या जीवनातल्या लहान-सहान घटना शेअर करण्यासाठी केवढी विवीध माध्यमं वापरत असतो सतत. कुठल्याही पातळी वरचा एकटेपणा आपण आपल्या नकळत टाळत असतो. त्यामुळेचा हा एकाकी प्रवास समजून घेणे अधिकच अवघड होऊन बसतं.
त्या काळात "१००% ridiculous" अशा शब्दात ज्याची बोळवणं करता येईल अशी "कुटुंब नियोजना"ची कल्पना! तिचा खोलवर अभ्यास करुन, तिचे समाजाच्या वाटचालीतले अनन्यसाधारण असे महत्व जाणून घेऊन, त्या गोष्टीचा स्वत: चालविलेल्या "समाजस्वाथ्य" ह्या मासिकातून तसेच घराघरात जाऊन प्रसार करणं. रधों आणि मालती यांनी सुरुवातीपासूनच मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे ह्या लढ्याला वैयक्तिक स्वार्थाची कारणं काहीही नाहीत.
"त्या रबरी फुग्यात कितीतरी शिवाजी/ज्ञानेश्वर वाहून गेले असतील" असल्या इरसाल/कडव्या विरोधांचा समाज. आणि तेव्हा स्त्रीला किती आणि केव्हा मुलं हवीत हे ठरविण्याचाच अधिकार असावा, हे नुसतं धाडसाचंच नाही तर वेडगळपणाचं वाटावं.
त्यावेळच्या समाजातील स्त्रिची उपेक्षित आणि दुय्यम अशी भूमिका लक्षात घेता, हे काम/ हा वेडगळपणा नक्की कोणत्या प्रेरणेने केले असेल किंबहुना जी गोष्ट फक्त आपल्याला दिसते आहे, पटते आहे, त्याचा आयुष्यभर पाठपुरावा करणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या समाजासाठी हे सगळं करायचं, त्या समाजाला ही गोष्ट आपल्यासाठी, आपल्या स्वाथ्यासाठी आहे ही जाणीवही कोसो दूर! त्यामुळे ह्या प्रवासात समाजाकडून वाट्याला आली ती फक्त अवहेलना, उपहास आणि निंदा!
जवळपास एकाकीपणाच्या अंधारातूनच हा त्यांचा प्रवास सुरु होता. अपवाद अर्थातच काही मोजक्या समविचारी लोकांचा, समाजसुधारकांचा. पण काळाच्या पुढे जाऊन विचार करणे म्हणजे नक्की डोळ्यासमोर काय दिसत असतं? त्या द्रष्ट्या दृष्टीसमोर कोणता प्रकाश असतो तो ह्या एकाकी प्रवासाचा मार्ग उजळून टाकतो? तो प्रकाश आयुष्यभर तेवत राहावा ह्या साठी नेमकी कोणती शक्ती त्यांच्यात असते? सध्या काळाच्या वेडेपणातच उद्याच्या काळासाठी लागणारे शहाणपण आहे हे कसं कळतं? आणि ते शहाणपणं कळलेले फारसे कुणी बरोबर नसतांना, आयुष्याच्या शेवटापर्यंत स्वत:च्या आयुष्याचा अर्थ बनून कसं जगता येतं?
"ध्यासपर्व" बघितल्या नंतर असे अनेक प्रश्न आपल्याला अस्वथ्य करत राहातात. स्वत:च्या कोत्या आयुष्यात गगनभरारी चे स्वप्न ओझरते झिरपते मनात ते ह्या द्रष्ट्या लोकांमुळे, काळाच्या परिमाणांना नविन अर्थ देणाऱ्या रधोंमुळे !
(लमाल फेब्रुवारी २०१४)
(लमाल फेब्रुवारी २०१४)
No comments:
Post a Comment